आमच्या मुलांना (खिचडी) शालेय पोषण आहार नको, वाघिणीचे दुध द्या(तालिब शेख, पिंपळगाव हरेश्र्वर)

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०६/२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून या गावात इयत्ता आठवी पर्यंत उर्दू शाळा आहे. परंतु या उर्दू शाळेत सन २०१२ पासून शिक्षक संख्या अपूर्ण असल्याकारणाने शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक संतप्त झाले असून उर्दू शाळा समितीचे अध्यक्ष तालीब शेख यांनी संतप्त प्रतिक्रिया देत आमच्या मुलांना (खिचडी) शालेय पोषण आहार देऊ नये परंतु शिक्षक संख्या पुर्ण करुन चांगले शिक्षण द्यावे कारण आयुष्यात शिक्षण अती महत्वाचे आहे म्हणूनच शिक्षणाला वाघिणीचे दुध म्हटले आहे व शिक्षण हा तीसरा डोळा आहे असे मत व्यक्त करत त्वरित शिक्षक वाढवून द्यावेत अशी मागणी केली करत शासन व प्रशासनाविरोधात तिव्र शब्दात खडे बोल सुनावले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पिंपळगाव हरेश्र्वर येथे इयत्ता आठवी पर्यंत उर्दू शाळा आहे. या शाळेसाठी प्रशस्त अशी इमारत असून खेळण्यासाठी पटांगण तसेच निसर्गसौंदर्याने नटलेल्या शाळेत मात्र शिक्षक संख्या अपूर्ण असून २५५ विद्यार्थीसंख्या असल्यावर ही फक्त चारच शिक्षक कार्यरत आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे ३५ विद्यार्थी संखेमागे एक शिक्षक असणे गरजेचे आहे. तरीही पिंपळगाव हरेश्र्वर येथील उर्दू शाळेत फक्त आणि फक्त चारच शिक्षक असल्याकारणाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
तालिब शेख शेख हे पिंपळगाव हरेश्र्वर येथील जिल्हापरिषद उर्दू शाळा समितीचे सन २०१० पासून सदस्य तसेच २०१२ पासून समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या मते प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षण महत्त्वाचे आहे व ते प्रत्येकाला मिळालेच पाहिजे व ते देण्याकरिता याकरिता शासन कटिबद्ध आहे. परंतु प्रशासन व शासनाने त्यांची जबाबदारी झटकली असा भास असल्याचे तालिब शेख यांनी सांगितले कारण एका बाजूला सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी नाही म्हणून ते बेरोजगार भाकरीच्या शोधात फिरत आहेत. व दुसरीकडे जिल्ह्यात १९० तर तालुक्यात ३८ शिक्षक कमी आहेत. जर का शिक्षक भरती करण्यात आली तर सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल व विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळुन त्यांचे आयुष्य, भविष्य सुधारेल असे तालिब शेख यांनी सांगितले.
पिंपळगाव हरेश्वर येथील जिल्हापरिषद उर्दू शाळेत सन २०१२ पासून शिक्षक संख्या कमी आहे. याबाबत तालिब शेख हे सतत पाठपुरावा करत असतांनाच ते माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ, विद्यमान आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील, पंचायत समिती सदस्य सौ. रत्नप्रभा ताई पाटील, जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे, मंत्री महोदय मा. श्री. गिरीश भाऊ महाजन, जिल्हापरिषदेचे मा. श्री. दिलीप गोडे सर हे पदाधिकारी व अधिकाऱ्यांना भेटून सुध्दा आजपर्यंत शिक्षक मिळाले नसल्याने पिंपळगाव हरेश्वर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.