अंबे वडगाव येथील ३२ वर्षीय तरुणाचा अकस्मात मृत्यू.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील योगेश अंबादास सपकाळे वय अंदाजे ३२ वर्षं हा सकाळी साडेदहा वाजेपासून शेंदुर्णी येथे गेलेला होता. परंतु दुपारी एक वाजेच्यासुमारास तो शेंदुर्णी येथील ताडीच्या दुकानाजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. याला पाहून बघ्यांची गर्दी जमली या गर्दीतील काही लोकांनी ओळखले व तो अंबे वडगाव येथील असल्याची माहिती समोर आली.
या माहितीवरुन काही लोकांनी अंबे वडगाव येथील काही ओळखीच्या लोकांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून फोटो टाकून ओळख पटवण्यासाठी सांगितले फोटो पाहिल्यानंतर तो योगेश अंबादास सपकाळे असल्याचे निष्पन्न झाले. माहिती मिळताच अंबे वडगाव येथील हर्षल वाघ, पितांबर सपकाळे, हर्षल सपकाळे व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत योगेशचा मृत्यू झाला होता.
या घटनेची खबर दूरक्षेत्र शेंदुर्णी पोलीस चौकीत दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करत मयत योगेश सपकाळेचा मृतदेह पहुर येथील ग्रामीण रुग्णालयात नेऊन तेथे त्याचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेबाबत अंबे वडगाव गावासह, पंचक्रोशीतील गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
योगेश अंबादास सपकाळे हा शेंदुर्णी येथील मान्यताप्राप्त ताडी विक्रीच्या दुकानावर सकाळी अकरा वाजेपासुन सतत ताडी पित होता. व याच ताडी विक्रीच्या दुकानाजवळच हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला होता व येथेच त्याचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. योगेश सपकाळे याच्या पाश्चात्य दोन बहिणी व आई असा परिवार आहे.