नैतिक कर्तव्य समजून मतदान करा! मृत्यूकार विनोद अहिरे यांच्या लेखणीतून.
नैतिक कर्तव्य समजून मतदान करा! मृत्यूकार विनोद अहिरे यांच्या लेखणीतून.
२५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाल्याने, २५ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतभर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात असतो. संविधानाने आपल्याला सर्वात मोठा हक्क दिला आहे तो म्हणजे मतदानाचा.
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जमीनदार, गर्भश्रीमंत अर्थात इंग्रज शासनाला आपल्या वार्षिक उत्पन्नातून तीन हजारापर्यंत महसूल देत असत, अशा लोकांनाच मतदान करण्याचा अधिकार होता, त्यामुळे गरिबांचा मतदान करण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु आता मात्र गरिबातील गरीब व्यक्तीच्या मतदानाचे जे मूल्य आहे, तेच मूल्य देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे मताचे आहे. म्हणूनच आपण सर्वप्रथम घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले पाहिजे, की त्यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान मतदानाचा अधिकार बहाल केला.
परंतु या अधिकाराचा वापर आपण गांभीर्याने करतो का? हा देखील संशोधनाचा विषय आहे. आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, ही सर्वसाधारण लोकशाहीची व्याख्या आहे. ही लोकशाही यशस्वी करण्यामागे येथील नागरिकांचा म्हणजे मतदारांचा मोलाचा सहभाग आहे. परंतु बरेच लोक मतदान करण्यासाठी उत्साही नसतात. काही महाभाग तर मतदानाच्या सुट्टीच्या दिवशी चक्क पिकनिकचे आयोजन करतात. माझी तर इच्छा आहे, कि या लोकांना काही वर्षे उत्तर कोरिया सारख्या हुकूमशाही देशांमध्ये वास्तव्यास पाठवले पाहिजे. तेव्हा यांना मतदानाचे महत्त्व कळेल.
आपले मत कोणालाही असो आपण कर्तव्य म्हणून मतदान केलेच पाहिजे. ते कर्तव्य कोणत्या पक्षाप्रती, कोणत्या उमेदवाराप्रती नसते, तर ते आपल्या स्वतः प्रति असते. कारण निवडून दिलेला उमेदवाराच्या माध्यमातून आपण स्वतः तथा इथला प्रत्येक नागरिक अप्रत्यक्षपणे राज्यकारभार करत असतो. म्हणूनच आपल्या हितासाठी मतदान हे केलेच पाहिजे. त्यामुळे पुढचे पाच वर्षांचे आयुष्य कसे असावे हे आपल्या मतदानाने ठरत असते. कारण आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जेवढे चांगले असतील तेवढा देशाचा कारभार चांगला होईल आणि देशाच्या हिताचा विचार होईल. बऱ्याच वेळा आपण एकट्याने मत न दिल्याने असा कोणता मोठा फरक पडणार आहे, असा विचार करणारे या देशात बरेच जण आहेत. पण असा विचार आत्मघाती आहे.
आपल्या एका मताने ही फरक पडू शकतो! हे लक्षात घेतले तर मतदानाचे खरे मूल्य लक्षात येऊ शकेल. हल्ली काही जण आपले मत विकायला लागले आहेत. मत विकणे म्हणजे आपल्या स्वतःला विकणे,आपल्या स्वाभिमानाला विकल्या सारखं आहे. अशाच प्रकारे मत विकण्याची सवय वृद्धिंगत होत गेली, तर या देशात हुकूमशाहीचा जन्म होईल आणि भविष्यात मोठी अराजकता माजल्या शिवाय राहणार नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. विशेष करून तरुणांनी याकडे अत्यंत गांभीर्याने बघितले पाहिजे त्यांनी आपल्या स्वतःसहं समाजामध्ये मतदानाबद्दल जनजागृती घडवून आणली पाहिजे. सुदृढ व सक्षम लोकशाही निर्माण करण्यासाठी मतदान हे केलेच पाहिजे. ही विचारधारा प्रत्येकाने जोपासली पाहिजे. जे भावी मतदार आहेत किंवा ज्यांनी वयाची अठरा वर्षे नुकतीच पूर्ण केली आहे, अशा तरुणांनी तर एक देश सेवा मानून मतदान जागृतीसाठी स्वतःला झोकून दिले पाहिजे.
कारण लोकशाही देशात युवक हा महत्त्वाचा व जबाबदार घटक आहे. युवकांमध्ये लोकशाही पेलण्याचे सामर्थ्य निर्माण होणे आवश्यक आहे, व त्यासाठी गुणवत्ता सिद्ध करण्याची आवश्यकता आहे. आज सुदैवाने भारतीय लोकशाही समोर असणारी आव्हाने पेलण्यास भारतीय युवकांमध्ये क्षमता आहे. त्यांनी आपली क्षमता लक्षात घेऊन आव्हानांचा स्वीकार करून लोकशाहीच्या माध्यमातून एक सशक्त आणि बलशाली राष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजे.
जय हिंद जय भारत
पोलीस नाईक विनोद अहिरे पोलीस मुख्यालय जळगाव
९८२३१३६३९९
लेखक~जळगाव जिल्हा पोलीस दलातील साहित्यिक/कवी आहेत.