सातगाव डोंगरी येथील स्वस्त धान्य दुकानाच्या सेल्समन विरोधात, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०९/२०२२
पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील स्वस्त धान्य दुकान हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून मागील बऱ्याच वर्षांपासून चालवण्यात येत आहे. हे स्वस्त धान्य दुकान चालवण्यासाठी शंकर बाजीराव पवार यांची सेल्समन म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
एक छोटासा बालक आपल्या वडिलांच्या सोबत धान्य मिळवण्यासाठी झगडतांना.
हे स्वस्त धान्य दुकान जरी सातगाव डोंगरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून चालवण्यात येत असले तरी या दुकानात नियुक्त असलेले सेल्समन यांच्या मनमानी कारभारामुळे रेशनकार्ड धारकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत असून शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार पुरेपूर धान्य अधिकृत रेशनकार्ड धारकांना मिळत नसल्याच्या तक्रारी मागील तीन वर्षांपासून शेकडो लाभधारक करत आहेत. वास्तविक पाहता रेशनकार्ड धारकांच्या तक्रारी आल्यानंतर जी सहाकरी संस्था हे दुकान चालवत आहे म्हणजे सातगाव डोंगरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाने याची दखल घेऊन सत्यता पडताळून पाहात सेल्समन जर मनमानी करत असेल तर त्याला समज देणे किंवा त्याजागी दुसरा सेल्समन नेमणूक करणे तसेच रेशनकार्ड धारकांच्या तक्रारी खोट्या असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे होते.
परंतु जवळपास मागील तीन वर्षांपासून सेल्समन व रेशनकार्ड धारकांच्या तक्रारींचा संघर्ष सुरू असतांना विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व संचालक यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सेल्समनची मनमानी व दादागिरी वाढल्याने हक्काचे रेशनिंगचे धान्य मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या रेशनकार्ड धारकांच्या सहनशीलताचा अंत झाला व यातूनच दिनांक १७ सप्टेंबर २०२२ शनिवार रोजी सातगाव डोंगरी येथील स्वस्त धान्य दुकानाचे सेल्समन शंकर बाजीराव पवार यांच्या विरोधात रेशनकार्ड धारक लाभार्थी विलास मुरलीधर काथार यांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला एन. सी. आर. ३२३, ५०४ नुसार तक्रार दाखल करण्यात आली असल्याने गावपातळीवर जोरदार चर्चा सुरू आहे.
याबाबत विलास मुरलीधर काथार यांनी सत्यजित न्यूजकडे संपर्क साधून दिलेली माहिती अशी की डोंगरी सातगाव येथील स्वस्त धान्य दुकान हे सातगाव डोंगरी येथीलच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून चालवण्यात येत आहे. या दुकानात सेल्समन म्हणून शंकर बाजीराव पवार हे काम पहात असून हे रेशनिंग वाटप करतांना ई पॉश मशीन खराब असल्याचा बहाणा पुढे करत रेशनकार्ड धारकांना धान्य वाटप करतांना ई पॉश मशीनवर अंगठा घेऊन पावती न देताच धान्य वाटप करतांना लाभधारकांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार धान्य वाटप करत नाहीत दरमहा दरडोई धान्य कमी आल्याचे सांगून कमी धान्याचे वितरण करतात याबाबत जास्त विचारणा केली असता अरेरावीची भाषा करुन पटत असेल तर घ्या नाहीतर चालते व्हा असे सांगून वाद घालतात व हाकलून लावतात तसेच आमच्या विरोधात कुठेही अर्जफाटे करा आमचे काहीच होणार नाही उलट आम्ही सांगितले तर तुमचे रेशनकार्ड रद्द करुन दाखवून देतो अशी धमकी भरुन खोटा गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगतात असा खुलासा दिला आहे. तसेच मी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केल्यानंतर मला संबंधित सेल्समन हा हस्ते, परहस्ते धमकावत असून भविष्यात माझ्यावर खोटा गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मी आता मा. तहसीलदार साहेब पाचोरा यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले.
(स्वस्त धान्य दुकान म्हणजे गोरगरिबांच्या नावाने येणाऱ्या धान्याचा काळाबाजार करुन स्वताच चांगभलं करुन घेण्यासाठी असलेली योजना आपल्याच बापाची समजून पुरवठा अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदार वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही कारण आजच्या परिस्थितीत गावागावातून स्वस्त धान्य दुकानदार दरमहा वेळेवर व पुर्णपणे धान्य वाटप करत नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असून याबाबत सखोल चौकशी होत नसल्याने या भ्रष्टाचाराला दुजोरा मिळाला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून वाटप न झालेले धान्य मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. असे काळ्या बाजारात जाणारे धान्य कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ट्रक च्या ट्रक पकडून जमा केलेल्या आहेत. तसेच बऱ्याचशा तांदळाच्या फॉक्टरीत हा तांदूळ पोहच होतो व तेथे त्याला पॉलिश करून पुन्हा बाजारात आणला जात असल्याचे जनमानसातून चर्चेतून ऐकायला मिळत आहे.)
या बाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यातील गावागावांतील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानी कारभाराला कंटाळून गावागावातून वाढत्या तक्रारी समोर येत आहेत. पैकी काही गावातून पाचोरा तालुक्याचे मा. तहसीलदार, पुरवठा विभाग तसेच मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार अर्जफाटे व तक्रार करुनही काहीएक फायदा होत नसल्याने व मा. जिल्हाधिकारी व मा. तहससीलदार साहेब यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी पुरवठा विभागाला वारंवार आदेश दिल्यावरही पाचोरा पुरवठा विभागाकडून फक्त आणि फक्त नावालाच संबंधित स्वस्त धान्य दुकानाच्या चौकशीसाठी नाटक केले जाते व योग्य प्रकारे चौकशी न करता किंवा तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची शहानिशा न करता स्वस्त धान्य दुकानदारांना पाठीशी घालण्याचा गोरखधंदा करुन स्वस्त धान्य दुकानदार व पुरवठा विभागाचे जबाबदार चौकशी अधिकारी मिलीभगत करून संबंधित तक्रार खोटी असल्याचे भासवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना खोटा अहवाल पाठवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करून जनतेच्या भावनांशी खेळ खेळत असल्याचा आरोप गावागावांतील तक्रारदारांनी केला आहे.
सद्यस्थितीत पाचोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार ई पॉश मशिन खराब असल्याचा बहाणा करत रेशनकार्ड धारकांना किती धान्य वितरीत केले गेले आहे याची कोणतीही पावती देत नाहीत. तसेच प्रत्येक व्यक्तीला शासनाकडून ठरवून दिलेले दरडोई धान्य पुर्णपणे न देता कमी धान्याचे वाटप करत आहे. तसेच मोफतचे धान्य कमी आलेले आहे किंवा या महिन्यात वरुनच धान्याचा पुरवठा करण्यात आलेला नाही. अश्या सबबी सांगून रेशनकार्ड धारकांना कमी धान्याचे वाटप करण्यात येत आहे. अश्या तक्रारी गावागावातून मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.
विशेष म्हणजे स्वस्त धान्य दुकानात स्वस्त धान्य दुकानदारांकडून कोणताही माहिती फलक लावण्यात आलेला नाही. नियमानुसार प्रत्येक धान्य दुकानातून दुकानाचे नाव, दुकान कुणाच्या नावावर आहे. दुकानाचा लायसन क्रमांक, दरमहा मिळणारे गहू, तांदूळ व इतर धान्य किती मिळाले, किती वाटप झाले, किती शिल्लक आहे याबद्दल दररोज माहिती लिहिणे क्रमप्राप्त आहे. तसेच तालुका व जिल्हास्तरीय संबंधित अधिकाऱ्यांचे कार्यालयीन दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक लिहिणे बंधनकारक आहे. तरीही असे माहिती फलक कुठेच दिसून येते नाहीत.