मेन लाइनचा तुटलेला जंप दुरुस्थ करीत आसतांना विजेच्या खांबावर कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू. चौकशीची मागणी.
दिलीप जैन.( पाचोरा )
दिनांक~०९/०२/२०२१
जामनेर तालुक्यातील पहुर परिसरात मेन लाइनचा तुटलेला जंप दुरुस्थ करीत आसतांना विजेच्या खांबावरच विद्यूतवितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे एका कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना काल ८ फेब्रुवारी सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पहूर , जामनेर मार्गावर सोनाळा फाट्याजवळील रोहिणी हॉटेलच्या समोर घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की ,सोनाळा शिवारात ११ हजार किलो वॅट क्षमतेच्या वीज वाहिनीच्या पोलवरील तुटलेला जंप दुरुस्त करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या पहूर -२ कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र प्रकाश पवार (वय – ३८ ) हे विद्युत खांबावर चढले . जंप दुरुस्त करण्याचे काम सुरू असताना वीज पोल वरच त्यांचा मृत्यू झाला . पोलवर लटकलेल्या स्थितीत शेजारील शेतकऱ्यांनी त्यांचा मृतदेह पाहिला असता त्यांना धक्काच बसला .सदर घटनेची शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली . माहीती मिळताच उपकार्यकारी अभियंता व्ही . डी .सोनवणे , सहाय्यक अभियंता गजानन सोनवणे ,पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहूल खताळ आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला .मयत राजेंद्र पवार यांचा मृतदेह पोल वरून खाली उतरवितांना गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते .या घटनेची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे . जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले . राजेंद्र पवार हे जामनेर येथे लक्ष्मी कॉलनीत राहात होते . पहूर २ विज वितरण कंपनीच्या कार्यालयात ते वरीष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते . त्यांच्या कडे सोनाळा भागाची जबाबदारी होती .गेल्या दहा वर्षांपासून ते वीज वितरण कंपनीत चांगली सेवा देत होते .स्वभावाने विनोदी आणि मनमिळावू असलेल्या राजेंद्र पवार यांच्या अकस्मात मृत्यूने सोनाळा -पहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .त्यांच्या पश्चात दोन मुले ,पत्नी ,भाऊ असा परिवार आहे .
[मुख्य विद्यूतवाहीनीवर खांबावर चढून विद्यूतवितरण कंपनीचाच जबाबदार कर्मचारी काम करत असतांना त्यांचा विद्यूतखांबावरच अपघाती मृत्यू होतो ही घटना म्हणजे विद्यूतवितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा एक मोठा पुरावा आहे.
विद्यूतवाहीनीवर जंप जोडण्यासाठी रीतसर परमिट घेतल्याशिवाय तसेच ट्रान्सफॉर्मर जवळ जबाबदार व्यक्ती उभा करून किंवा डी.पी. ला कुलुप लावल्याशिवाय कोणताही कर्मचारी खांबावर चढत नाही.
तसेच एकवेळा परमिट घेतल्यानंतर संबधित कर्मचाऱ्याने कार्यालयात खबर दिल्याशिवाय पून्हा विद्यूतपुरवठा सुरू केला जात नाही. मग काम सुरु असतांनाच विद्यूतपुरवठा कोणी सुरु केला ही महत्त्वाची बाब असून लाईनमनच्या हाताखाली विद्यूतसहाय्यक, किंवा हेल्पर का देण्यात आला नाही.
तसेच लाईनमन विद्यूतखांबावर काम करत असतांनाच विद्यूतपुरवठा सुरु होतो व त्यात एका कर्मचाऱ्याचा दुदैवी मृत्यू होतो ही घटना म्हणजे अधिकारी फक्त उंटावरून शेळ्या चारतात की काय असा प्रश्न निर्माण होतो.
तसेच जनमानसातून मिळालेल्या माहितीनुसार पहुर ते नेरी रस्त्यावर बरेचसे विद्यूतग्राहक हे व्यवसाईक आहेत. तसेच याच भागात मोठ्या प्रमाणावर विद्यूतचोरांची संख्या असल्याने अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचारी फक्त हप्ते जमा करण्यासाठी नेमले जातात व निष्ठावंत कर्मचारी दिवसभर कामात भरडला जातो अशी चर्चा पहुर , नेरी परिसरात दिवसभर जनमानसात दिवसभर सुरु होती.
तरी या घटनेची चौकशी होऊन विद्यूतवितरण कंपनीच्या जबाबदार अधिकारी यांना जाब विचारला जावा. म्हणजे भविष्यात अश्या घटना घडून कर्मचाऱ्यांना नहाकच जिव गमवावा लागणार नाही. अशी मागणी होत आहे.]