पाचोरा तालुक्यात चालतोय भ्रष्टाचाराचा असाही जादू मंतर, रेशनिंगच्या तांदळाचे होते बासमतीत रुपांतर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/११/२०२१
सद्यस्थितीत शासन धर्मराजाची भुमिका निभावत स्वस्त धान्य दुकानाचे माध्यमातून रेशनकार्डावर कधी मोफत तरी कधी माफक दरात गहू, तांदूळ देत आहे. मात्र हे गोरगरिबांसाठी येणारे धान्य वाटप करतांना अधिकारी वर्गाच्या संगनमताने कमालीची खेळी खेळून यातील बरेचसे धान्य काळ्याबाजारात जात आहे. तर बरेचसे व्यापारी आपल्या हस्तकांना गावागावात पाठवून दहा रुपये प्रतिकिलो प्रमाणे तांदूळ विकत घेऊन त्याचा काळाबाजार करत असल्याचे खात्रीपूर्वक समजते.
नंतर हा तांदूळ पाचोरा तालुक्यातील एका खेडेगावातील राईस मिल मध्ये चोरट्या मार्गाने पाठवून रेशनिंगचे शासकीय बारदाण बदलून पध्दतशीरपणे पॉलिश करुन त्या रेशनिंगच्या तांदळाचे बासमती किंवा बाजारात मिळणाऱ्या इतर वाणाच्या तांदळासारखा तांदूळ बनवून तांदळावर करण्यात आलेल्या प्रकियेनुसार त्याला सुगंधित बनवून ३५ ते ६० रुपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री करणारी एक टोळी पाचोरा तालुक्यात सक्रिय असल्याचे जनमानसातील खमंग चर्चेतून ऐकावयास मीळत असल्याने हा एक कुतूहलाचा विषय आहे.
विशेष म्हणजे पाचोरा तालुक्यातील एका खेडेगावातील या कथित राईस मिल मध्ये सेंधवा, मराठवाडा व जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून तसेच गावागावातून तांदूळ संकलन करुन त्या राईस मिलमध्ये त्वरित पॉलिश व इतर प्रक्रिया करुन तो बाजारात विक्रीसाठी पाठवला जात असल्याचे सांगितले जाते.
तरी या गैरप्रकारांना आळा घालून गोरगरिबांच्या हक्काच्या धान्याचा घोटाळा करणारांना पकडून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.