कुऱ्हाड बुद्रुक उमडदे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार, शेतकरी व मजूर भयभीत.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०६/२०२१
कुऱ्हाड बुद्रुक येथील शेतकरी मा.श्री. भगवान रामचंद्र काळे यांची उमडदे शिवारात गट नंबर १६३ ही शेतजमीन आहे. याच ठिकाणी त्यांनी गुरांसाठी व्यवस्था केलेली असून या शेतात ते बैलजोडी व गायी, म्हशी बांधतात.
सोमवारी संध्याकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने संबधित शेतकरी रात्री शेतात झोपण्यासाठी जाऊ शकले नाहीत. नेमके याच रात्री भक्ष शोधण्यासाठी गुराढोरांच्या गोठ्याजवळ बिबट्या आला असावा परंतु त्याठिकाणी कुत्रा असल्याने जंगली श्वापदाने कुत्र्यालाच ठार केल्याची घटना सकाळी गायीचे दुध काढण्यासाठी भगवान काळे गेले असता त्यांच्या लक्षात आली.
त्यांनी आजुबाजुला पाहिले असता जवळच शेतात प्राण्यांच्या पायाचे ठसे आढळून आले.ते ठसे पाहिले असता जानकारांच्या मते ते बिबट्याच्या पायाचे ठसे असल्याचे सांगितले. म्हणून कुऱ्हाड बुद्रुक ,कुऱ्हाड खुर्द, कोकडी तांडा, मालखेडा व लाख तांडा परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सिध्द झाले आहे.
याबाबत मागील एक महिन्यापासून पंचक्रोशीतील शेतकरी शेतमजूर बिबट्या असल्याचे सांगत असतांनाही वनविभागाने कोणतीही दखल घेतलेली नाही. विशेष म्हणजे बिबट्या दिवसाढवळ्या या परिसरात फिरत असून एखाद्यावेळी जीवितहानी होऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही. या कारणांमुळे शेतकरी व शेतमजूर यांच्यात भीतीचे वातावरणात असल्याने शेतकऱ्यांना शेती मशागतीची कामे करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने मजूराअभावी शेती पडीक पडते की काय अशी चिंता शेतकऱ्यांना आहे.
*बिबट्या व इतर जंगलातील प्राणी मानववस्तीकडे येण्याची कारणे.)
पाचोरा व जामनेर वनविभाग फक्त नावालाच असून राखीव जंगलात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने जंगल नाहीसे होत आहेत. तसेच काही भागात जंगलात लोकांनी अतिक्रमण करत शेती तयार करून ती वहिवाटी केल्याचे समजते. तसेच राखीव जंगलांमध्ये झाडांची संख्या झपाटय़ाने कमी होत असून इतर प्राण्यांच्या शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्या सारख्या मांसाहारी प्राण्यांला जंगलात खाद्य मिळत नाही तसेच जंगलात पाणवठे नसल्याने या हिंसक प्राण्यांनी आपला मोर्चा मानव वस्तीकडे वळवला आहे. याबाबत वनविभागाला वारंवार सांगितल्यावरही कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. म्हणून या बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा अन्यथा जीवित हानी होऊ शकते असे मत व्यक्त करत वनविभागाच्या कामकाजाबद्दल जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.