भाजपमध्ये यायचे असेल तर ते येऊ शकतात

मुंबई
काँग्रेसपक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे. त्यावरून विविध प्रतिक्रिया राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता, त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याबाबत एक मोठे विधान केले आहे. जर बाळासाहेब थोरात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांना तुम्ही पक्षात घेणार का? असा सवाल त्यांना विचारला असता, त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, कुणालाही भाजपमध्ये यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही सर्वांचे स्वागतच करत आहोत. अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘आमचा राजकीय पक्ष आहे. पक्ष वाढविणे हे आमचे काम आहे. बाळासाहेब थोरात असो किंवा अन्य कुणीही असो. जर भाजपात प्रवेश करण्यास इच्छूक असेल तर त्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही त्यांना प्रवेश देत असतो. पण बाळासाहेब थोरात भाजपात प्रवेश करतील, अशी शक्यता मला वाटत नाही. बाळासाहेब थोरात यांच्या रक्तात काँग्रेस आहे. काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी खूप मोठे काम केले आहे. प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसला त्यांनी सावरले होते. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करतील, असे मला वाटत नाही.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या भाजप प्रवेशावर दिली.