पाचोरा तालुक्यात मोबाईल चोरणारी व चोरीचे मोबाईल घेणारी टोळी सक्रिय, सर्वसामान्य नागरिकांची फसगत.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०६/२०२३
सद्यस्थितीत सगळीकडे भुरट्या चोऱ्या, रस्ता लूट, खिसा, पाकीट मारी, महिलांच्या अंगावरील दागिन्यांची तसेच मोटारसायकल चोरी होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक व महिलावर्गासह सगळीकडे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
यामागील सत्य जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता पैसे, दाग, दागिने व मोबाईल चोरी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होण्याची कारणे म्हणजे हा चोरीचा माल घेणारे एक रॉकेट जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात सक्रिय असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. वरील सुखवस्तू चोरी करणारी एक टोळी सक्रिय असून या टोळीतील सदस्य चोरी केल्यावर चोरीची वस्तू, दागिने, मोबाईल व इतर वस्तू त्यांच्या दलाला मार्फत बाजारात विक्री करत आहेत. तर मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय करणारे तसेच काही मोबाईल विक्रीचा व्यवसाय करणारे दुकानदार हे जुने सेकंड हॅन्ड मोबाईल अत्यल्प दरात खरेदी करुन आपल्या दुकानातून सर्रासपणे विक्री करुन दामदुप्पट पैसे काढण्याचा गोरखधंदा करत आहेत.
परंतु हे मोबाईल खेड्यापाड्यातील सर्वसामान्य नागरिक किंवा गरीब घराण्यातील शाळकरी मुले, मुली यांची नवीन मोबाईल घेण्याची ऐपत नसल्याने असे कमी किंमतीत मिळणारे मोबाईल विकत घेत आहेत. कारण ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना येणारी शासकीय मदत ऑनलाईन पध्दतीने मिळवून घेण्यासाठी आजच्या परिस्थितीत अँड्रॉइड मोबाईल असणे गरजेचे आहे. व याच गरजेपोटी मोबाईल घेतल्यानंतर त्यामध्ये स्वताच्या नावाने घेतलेले सिमकार्ड टाकल्यानंतर तो मोबाईल कुठे आहे हे लगेचच सिध्द होत असल्याने संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी हा चोरीला गेलेला मोबाईल कुणाकडे आहे, तो तुमच्याकडे कसा आला, कुठून घेतला इतर चौकशीसाठी संबंधित व्यक्तीला बोलावून घेत तपासणी सुरु करतात तेव्हा हा मोबाईल चोरीचा असल्याचे लक्षात येते परंतु हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले असल्याचे माहीत पडताच संबंधित मोबाईल विक्रेता मी याला ओळखत नाही, मी हा मोबाईल विकलेला नाही असे सांगून मोकळा होतो. कारण स्वस्तात जुना मोबाईल घेतांना कोणतेही बिल किंवा देवाणघेवाण केल्याचा ठोस पुरावा नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची व विद्यार्थी वर्गाची फसवणूक केली जात असल्याच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहे.
“जुने मोबाईल घेणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी”
जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात जुने व चोरीचे मोबाईल घेऊन ते विक्री करण्याचा गोरखधंदा करणाऱ्या मोबाईल दुकानदारांच्या दुकानाची झाडाझडती घेऊन त्यांच्याकडे जुने मोबाईल आढळून आल्यास त्या मोबाईलचे त्यांच्याकडे बिल आहे का ? ज्यांच्याकडून जुने मोबाईल विकत घेतले असतील त्याचा काही लेखाजोखा ठेवला आहे का ? मोबाईल खरेदी केल्याचे कोणतेही बिल नसतांना मोबाईल विकत घेतले कसे ? याबाबत सखोल चौकशी करुन चोरीचे मोबाईल घेऊन ते परस्पर विक्री करुन भोळ्याभाबड्या, सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
अश्या कारवाया झाल्यास मोबाईल, दाग, दागिने व इतर सुखवस्तू चोरी होण्याच्या गैरप्रकारांना आळा बसेल असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.