मेणगाव, बिलवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी, मेणगाव, बिलवाडी , कंकराळा गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/११/२०२३

यावर्षी अत्यंत कमी प्रमाणात पाउस झाला असल्याने सगळीकडे नद्या, नाले, पाझर तलाव, धरण, नालाबांध यांच्यामध्ये जेमतेम जलसाठा शिल्लक आहे. असे असल्यावरही जळगाव जिल्ह्यातील बऱ्याचशा नद्या, धरण व पाझर तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी केली जात असून या पाण्याचा शेतीसाठी वापर केला जात आहे. या पाणी चोरी सोबतच मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी केली जात असल्याचे दिसून येत असले तरी पाटबंधारे विभाग, विद्युत वितरण विभाग तसेच महसूल विभागाचे जबाबदार अधिकारी व कर्मचारी या पाणी चोरी व विद्युत चोरी कडे कमालीचे दुर्लक्ष करत असल्याने संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पाणी चोरांशी काही लागेबांधे तर नाहीत ना अशी शंका सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला असल्याची शासन दरबारी नोंद असून जामनेर तालुक्याच्या दक्षिणेला संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात फक्त ४२% पाऊस झाला असल्याची नोंद आहे. हिच परिस्थिती जामनेर तालुक्यातील असून या वर्षी दुष्काळ जाहीर करावा म्हणून जामनेर तालुक्याचे सर्वांचे आवडते नेते मंत्री मा. श्री. गिरीशभाऊ महाजन यांनी मोर्चा काढला होता असे खात्रीलायक वृत्त आहे.

परंतु असे असल्यावरही जळगाव जिल्ह्यातील सर्व नद्या, नाले, पाझर तलाव व धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी सुरु आहे. ही पाणी चोरी अशीच सुरु राहिल्यास जळगाव जिल्ह्यासह संभाजीनगर जिल्ह्यात गाव, खेड्यापाड्यात पिण्याच्या पाण्याचा तसेच गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. असाच काहीसा प्रकार जामनेर तालुक्यातील नांदुळ नदीवर बांधण्यात आलेल्या मेणगाव, बिलवाडी धरणावर सुरु असून या मेणगाव, बिलवाडी धरणातून जेव्हा, जेव्हा विद्युत पुरवठा सुरु असतो त्या वेळात तसेच काही शेतकऱ्यांनी पाणी उपसा करण्यासाठी स्वयंचलित डिझेल मशीनचा वापर करुन मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करत आहेत.

हा पाणी उपसा असाच सुरु राहिल्यास भविष्यात मेणगाव, बिलवाडी, कंकराळा या गावांना भिषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. तसेच वरील तीनही गावातील हजारो पाळीव गुरांढोरांसह जवळच असलेल्या राखीव जंगलातील हरण, नीलगाय, रानडुक्कर, वानरे या जंगली प्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. म्हणून पाटबंधारे विभाग, विद्युत वितरण कंपनी व महसूल विभागाने कोणाच्याही दबावाला बळी न पडता त्वरित कारवाई करुन मेणगाव, बिलवाडी धरणातून होणारी पाणी चोरी त्वरित थांबवावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या