दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१२/२०२३

पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे खुर्द गावाजवळ पुर्वेला पी. सी. के. कॉटन जिनिंग प्रेस असुन याठिकाणी मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करुन त्यावर प्रक्रिया केली जाते. परंतु संबंधित जिनिंगचे मालक व व्यवस्थापन समिती हे कारखान्यामध्ये कापूस खरेदी, कापूसाचे जिनिंगव्दारे बियाणे साफ करुन कापूस वेगळा करतांना व साठवणूक करतांना कृषी विभागामार्फत देण्यात आलेल्या सुचना व अटी, शर्ती व सुचनेनुसार गुलाबी बोंड अळीचा प्रसार व प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बोंड अळी प्रतिरोधक सापळे (फेरॉमन ट्रॅप) लावलेले नाहीत. तसेच कापूस जिनिंग करतांना उडणारी झांज जिनिंग क्षेत्राचे बाहेर उडून जाऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारच्या प्रभावी उपाययोजना केलेल्या नसल्याने जिनिंग सुरु असतांना संपूर्ण वर्षभर फॅक्टरीच्या चारही बाजूंना असलेल्या शेतकऱ्यांचा शेतात झिज उडून शेतातील पिकांवर विपरीत परिणाम होतो तसेच बोंड अळीचा प्रसार होऊन त्याच्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या झाडावरील प्रत्येक बोंडा मध्ये बोंड अळी आढळून येते यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

या समस्या घेऊन वडगाव आंबे खुर्द येथील शेतकरी मागील काही वर्षांपासून संबंधित जिनिंग मालकाला व तेथील व्यवस्थापन समितीच्या लोकांना भेटून बोंड अळी प्रतिबंधक सापळे व कापूस जिनिंग सुरु असतांना उडणारी झीज बाहेर जाणार नाही म्हणून उपाययोजना करण्यासाठी वारंवार मागणी करुनही संबंधित जिनिंग मालक व तेथील मॅनेजर लक्ष न देता अरेरावीची भाषा करत असल्याने दरवर्षी नुकसान होत असल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी सरतेशेवटी आज पाचोरा तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन आम्हाला नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पि. सी. कॉटन जिनिंग वर कारवाईची मागणी केली असुन या निवेदनावर ॲड. मंगेशराव गायकवाड, मिलींद भुसारे, सौ. प्रतिभाताई भुसारे, विकास चव्हाण, गजानन चंद्रे, मुकेश पाटील, राजु मराठे, जाबीर तडवी, शेनफडू पाटील, सौ. सुरेखा पाटील व उमेश शिंदे या त्रस्त शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

मा. तहसीलदार पाचोरा यांना निवेदन दिल्यानंतर येत्या आठ दिवसात संबंधित पि. सी. जिनिंग मालकाच्या विरोधात कारवाई न झाल्यास आम्ही सर्व शेतकरी आमची नुकसानभरपाई मिळेपर्यंत पाचोरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.