दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/१२/२०२३

पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये १३ वे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय दिमाखदार पध्दतीने संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून निर्मल फाऊंडेशनच्या अध्यक्षा आदरणीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी ह्उया पस्थित होत्या. या स्नेहसंमेलन प्रसंगी प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण करण्यात येऊन श्री. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सालाबादप्रमाणे विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्याविष्कार, पाणी आडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा, स्वच्छ भारत अभियान, आधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण सोबतच मोबाईलची अधीनता व त्याचे दुष्परिणाम यासारख्या विषयांवर नृत्याविष्कार व कलेच्या माध्यमातून सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वता वेगवेगळ्या भाषांमध्ये सुत्रसंचलन करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

विद्यार्थ्यांचा कलाविष्कार पाहून सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचे भरभरुन कौतुक केले तसेच असे कार्यक्रम घेतल्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो व यातूनच विद्यार्थ्यांचा विकास साधला जातो व होतकरु तरुण पिढी उदयास येऊन सामर्थ्यशाली राष्ट्र निर्माण करु शकते असे नमूद करत येणाऱ्या नववर्षानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या स्नेहसंमेलन प्रसंगी शाळेच्या उपाध्यक्षा श्रीमती. कमलताई पाटील, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, निर्मल सिड्सचे सर्व संचालक, पदाधिकारी, पालकवर्ग, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील, श्री. शाही जोसेफ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिव्या पाटील व श्रृतिका पाटील हिने केले तर कार्यक्रमाचे आभार कु. पार्थ निकम याने मानलेत.