पाचोरा ते शेंदुर्णी रस्त्यावर खड्डेच खड्डे व गवताच्या रांगा , सा.बा.विभागाला कुंभकर्ण झोपेतून जागे करण्यासाठी लवकरच हॉर्न बजाव आंदोलन
दिलीप जैन.(पाचोरा)
१९/११/२०२०
जामनेर ते पाचोरा महामार्ग १९ वर शेंदुर्णी ते पाचोरा दरम्यान, खड्डेच खड्डे पडले असून या रस्त्यावरून जातांना खड्यात रस्ते का रस्त्यावर खड्डे आहेत असा प्रश्न पडतो. मागे काही दिवसापासून या रस्त्यावर डागडुजी करण्यात आली, मात्र ति थातुरमातुर करण्यात आल्याने अजुनच डोकेदुखी वाढली असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.खड्यात बारीक खडी न टाकता मोठमोठे दगड ,वाळू व दगडाचा कच टाकण्यात आला मात्र त्यावर डांबर नसल्याने या ठिकाणी दुचाकी व इतर वाहने घसरुन दररोज अपघाताची मालिका सुरु आहे.तरी या रस्त्याचे त्वरित नुतनीकरण करण्यात यावे,अन्यथा एखाद्या वेळेस मोठा अपघात होऊन जिवीतहानी होऊ शकते अशी भिती व्यक्त केली जात असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
तसेच रस्त्याच्या दुतर्फा पराडे (साईड पट्ट्यावर) गवत उगले असून हे गवत डोक्याबरोबर वाढले आहे. या गवतात रात्री व दिवसा जंगली जनावरे , कुत्रे, मांजरी भक्ष्य शोधण्यासाठी लपून बसतात अचानक रस्त्यावर येतात या प्रकारामुळे बरेचसे अपघात होतात. तसेच रस्त्याच्या बाजुलाच मोठमोठे गवत असल्याने बैलगाडी , पायी चालणारे व मोठे वाहनधारक रस्त्याच्या कडेला वाहन घेण्यासाठी कचरतात व यातूनच समोरच्या वाहनाला कट लागणे , वाहनांची धडक होणे असे अपघात होतात.
अगोदर काही वर्षांपूर्वी या रस्त्यावर मैलकुली कामाला होते. ते या रस्त्यावर लक्षठेऊन पराडे साफसफाई करुन खड्डे बुजत असत परंतु आता मैलकुली किंवा एकही कामगार या रस्त्यावर दिसून येत नाही.
पाचोरा ते जामनेर रस्त्यावर दररोज अपघातांची मालिका सुरु आहे. या रस्त्याबाबतीत वारंवार तक्रारी वाढत असतांनाही पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभाग लक्षदेत नसल्याने या विभागाला कुंभकर्ण झोपेतून उठवण्यासाठी लवकरच हॉर्न बजाव आंदोलन छेडण्यात येणार आहे.