भोकरी ग्रामपंचायत ते वरखेडी बसस्थानकापर्यंतच्या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात येऊन रस्ता नुतनीकरण करण्यात यावा वरखेडी ग्रामस्थांची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०८/२०२३
पाचोरा तालुक्यातील वरखेडी हे बाजारपेठेचे गाव असून या गावातील बाजारपेठेतून वरखेडी ते डांभुर्णी हा रस्ता जातो हा रस्ता प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मागील वर्षीच बनवण्यात आला आहे. हा रस्ता गावातून जात असल्याने या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे तरीही या रस्त्यावरुन सालासार राईस मिलची अवजड वाहने जात येत असल्याकारणाने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यात पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
यामुळे या परिसरातील रहिवासी व वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून शाळेतील विद्यार्थ्यांना चिखलातून जावे लागते आहे तसेच खड्डे मोठ्या प्रमाणात असल्याने दररोज अपघाताची मालिका सुरू आहे. दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात दुकाने लावण्यासाठी जागा उपलब्ध राहीली नसल्याने चिखलात बसून आपला व्यवसाय करावा लागत आहे याबाबत वरखेडी ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभाग पाचोरा यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही काही एक फायदा होत नसल्याने वरखेडी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत तसेच वरखेडी गावातून अवजड वाहनांना बंदी घातली आहे तरीही सालासार राईस मिलची अवजड वाहने भरधाव वेगाने या रस्त्यावर धावत असतात यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली असल्याने या रस्त्यावर चालणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी वरखेडी गावातून केली जात आहे.