पिंपळगाव हरेश्वर रेल्व स्टेशन ते पिंप्री रस्त्याचे डांबरीकरण, निकृष्ट दर्जाचे चौकशीची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०१/२०२२
(पुढील बातमी) लवकरच
(‘कार्यकर्ते बनले ठेकेदार, विकास कामात भ्रष्टाचार’)
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर रेल्वे स्टेशन पासून पिंप्री पर्यंतच्या रस्त्यावर २५/१५ या योजनेतून जवळपास १०५००००/०० (साडेदहा लाख) रुपये खर्चून (४२०) चारशे वीस मीटर लांबीचे डांबरीकरण करण्यात आलेले आहे. परंतु हे डांबरीकरण करतांना रस्त्यावर खड्डे न भरता तसेच खाली टीकाव न करता थेट खडी टाकून डांबरीकरण करण्यात आलेले आहे. रस्ता बनवतांना रस्त्याची रुंदी कमी अधिक असून डांबर कमी प्रमाणात वापरले असून डांबराचे ऐवजी डांबरासारखेच दिसणारे रसायन वापरण्यात आल्याचा आरोप सुज्ञ नागरिक करत आहेत. तसेच डांबरीकरण केल्यानंतर या डांबरीकरणाची रोलिंग व्यवस्थित झाली नसल्याने हे डांबरीकरण हाताने कोरले तरी निघत आहे.
अशी परिस्थिती असतांना या कामावर देखरेख करणारे संबंधित अधिकारी व बांधकाम विभागाचे अभियंता यांनी या कामाकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष केले असल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे. याबाबत कोल्हे येथील काही ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदारांशी चर्चा केली असता अजून काम बाकी असल्याचा खुलासा केला असून सिलकोट झाल्यावर रस्ता चांगला होईल असे सांगण्यात येत आहे. परंतु रस्त्याच्या कामाचे बी.बी.एम. चे काम जर चांगले होत नसेल तर मग फक्त सिलकोटच्या नावाचे मेकअप करून निकृष्ट दर्जाच्या कामावर पांघरूण घालण्यासाठीचा हा प्रकार असल्याचे दिसून येते. म्हणून या झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन हे काम चांगल्याप्रकारे करुन घेण्यात यावे अशी मागणी पंचक्रोशीतील गावागावातून असंख्य ग्रामस्थांनी केली आहे.