कोकडी तांडा येथील झुकलेला विद्युत खांब सरळ करण्यासाठी विद्युत वितरण कंपनी अपघाताच्या प्रतिक्षेत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०५/२०२३
अंबे वडगाव येथून जवळच बंजारा समाजबांधवांचे कोकडी तांडा हे गाव असून येथील देवसिंग हेमराज राठोड यांच्या घराजवळील विद्युत खांब मागील एक वर्षापासून झुकलेला आहे. या झुकलेल्या विद्युत खांबाच्या जवळच पत्र्याची घरे असल्याने तसेच सद्यस्थितीत जोराच्या वादळ, वाऱ्यासह जोरदार बेमोसमी पाऊस पडत असल्याने या वादळात हा झुकलेला विद्युत खांब कोसळून किंवा खांबावरील विद्युत वाहिनीच्या तारा तुटून एखाद्या घरावर पडण्याची दाट शक्यता असल्याने एखाद्यावेळेस मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे कोकडी तांडा येथील भरवस्तीत हा झुकलेला विद्युत खांब मागील एक वर्षापासून तसाच झुकलेल्या अवस्थेतच उभा आहे. हा धोकादायक विद्युत खांब त्वरित सरळ करण्यासाठी कोकडी तांडा येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी विद्युत वितरण कंपनीकडे तसेच स्थानिक कर्मचाऱ्यांकडे वारंवार तक्रार करुनही हा विद्युत खांब आजपर्यंत सरळ करण्यात आला नसल्याने हा विद्युत खांब सरळ करण्यासाठी विद्युत वितरण कंपनी एखाद्या मोठ्या अपघाताच्या प्रतिक्षेत तर नाही ना अशी संतप्त प्रतिक्रिया कोकडी तांडा येथील रहिवाशांनी व्यक्त करत विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.