दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०१/२०२३

पाचोरा शहरासह तालुक्यातील खाजगी शिक्षणसंस्था तसेच जिल्हापरिषद अंतर्गत येणाऱ्या काही शाळा, कॉलेजमध्ये शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य सोडून बिनधास्तपणे भ्रमणध्वनीचा (मोबाईलचा) तासंतास वापर करत असल्याचे चित्र सगळीकडे बघावयास मिळत असून याबाबत काही विद्यार्थी व सुज्ञ पालक वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की सद्यस्थितीत सगळीकडे व सगळ्या क्षेत्रात भ्रमणध्वनी (मोबाईल) म्हणजे एक प्रतिष्ठेचा विषय ठरत असल्यामुळे महिला, पुरुष, वृध्द, तरुण, तरुणी दैनंदिन जीवनात वावरतांना चोवीस तास हातात भ्रमणध्वनी घेतल्याशिवाय दिसून येते नाहीत. चारचौघात एकत्र बसले असले तरीही ते आपसात संवाद साधतांना दिसून येत नसून प्रत्येकजण आपापल्या जवळ असलेल्या भ्रमणध्वनीच्या मुखपृष्ठावर (डिस्प्ले) बोटे फिरवत आपल्याच नादात गुंतलेले असतात.

असाच काहीसा प्रकार पाचोरा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील खाजगी शिक्षणसंस्था तसेच जिल्हापरिषद अंतर्गत येणाऱ्या शाळा, कॉलेजमध्ये दिसून येत आहे. बरेचसे शिक्षक हे तासंतास भ्रमणध्वनी हाताळतांना दिसून येतात अशी माहिती काही विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. शिक्षक हे मुलांना वर्गामध्ये बसवून ते स्वताहा भ्रमणध्वनीवर गुंतल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे मत काही विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सत्यजित न्यूज कडे व्यक्त केले आहे.

म्हणून या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी खाजगी शिक्षण संस्थेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक तसेच संचालक मंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच जिल्हापरिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी जातीने लक्ष घालून शाळा, कॉलेजमध्ये शिक्षकवर्गाकडून भ्रमणध्वनीचा होणारा वापर थांबवून विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे शिक्षण द्यावे अशी मागणी पालकवर्ग, विद्यार्थी व सुज्ञ नागरिकांनी केली आहे.