वडगाव जोगे येथील पाणीपुरवठा योजनेच्या नवीन विहिरीचे खोदकाम वादाच्या भोवऱ्यात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०३/२०२३
पाचोरा तालुक्यात अंबे वडगाव हे गाव असून या गावाला गृप ग्रामपंचायत आहे. या गृप ग्रामपंचायतीमध्ये अंबे वडगाव, कोकडी तांडा व वडगाव जोगे तांडा या दोन गावांचा समावेश आहे. अश्या या एकूण तीनही गावांसाठी कोकडी तांड्याजवळ असलेल्या म्हसाळा धरण परिसरात विहिरी खोदून पाणीपुरवठा योजना सुरु आहेत. तसेच आता वडगाव जोगे तांड्याकरीता नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असल्याने ही पाणीपुरवठा योजनेची नवीन विहिर कोकडी तांड्याजवळ असलेल्या म्हसाळा धरण परिसरात खोदकाम करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
मात्र या नवीन विहिर खोदण्यासाठी ज्या ठिकाणी अधिकृत परवानगी मिळाली आहे त्या ठिकाणी धरण परिसरातील अधिग्रहित शेत जमीनीवर एका सधन कुटुंबातील व्यक्तीने अनाधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याने त्याठिकाणी विहिरीचे खोदकाम न करता पाणी पुरवठा विभागाचे डेप्युटी इंजिनिअर मा. श्री. आशीष राठोड यांना मर्जीत घेऊन, संबंधित ठेकेदार व वडगाव जोगे येथील काही ग्रामस्थांनी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून अनाधिकृतपणे म्हसाळा धरण्याच्या भिंतीपासून अगदी म्हणजे ३०० मीटरच्या आत जवळच तसेच अंबे वडगाव गावच्या पाणीपुरवठा विहिरीच्या अगदी जवळच खोदकाम सुरू केले असल्याने अंबे वडगाव ग्रामस्थांनी या ठिकाणी विहीरीचे खोदकाम करु नये अशी भुमिका घेऊन विहीरीचे खोदकाम थांबवले आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता अंबे वडगाव ग्रामस्थांनी ही विहीर खोदण्यात येऊ नये म्हणून आक्षेप घेतला आहे. कारण धरणाच्या भिंतीपासून ३०० मीटरच्या आत कोणतेही खोदकाम किंवा भूसुरुंग लाऊ नये असा नियम असल्यावरही सदरच्या विहीरीचे खोदकाम करतांना शासनाचे नियम धाब्यावर बसवून ३०० मीटरच्या आत खोदकाम सुरु केले असल्याने विहीरीचे खोदकाम करतांना दगड फोडण्यासाठी ब्लास्टिंग वापर केला जात असल्याने धरणाच्या भिंतीचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच अंबे वडगावची पाणीपुरवठा विहिर व वडगाव जोगे गावासाठी खोदण्यात येत असलेल्या नवीन विहिरीचे अंतर फक्त आणि फक्त साठ फुटावरच आहे. तसेच अंबे वडगाव गावच्या विहिरीला पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून ज्या ठिकाणी आडवे बोअरिंग केले आहे त्याच ठिकाणी हि विहीर खोदली तर भूगर्भातील आडवे बोअरिंग खंडित होतील व अंबे वडगावच्या विहीरीची पाण्याची आवक कमी होऊन व ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल म्हणून आम्ही या ठिकाणी कदापीही विहीरीचे खोदकाम करु देणार नाही अशी भूमिका घेत विहीरीचे खोदकाम असेच सुरु राहिल्यास आम्ही आंदोलन सुरु करु अशी भुमिका घेतली आहे.
महत्वाचे ~
म्हसाळा धरण्याच्या भिंतीजवळ ३०० मीटरच्या आत अनाधिकृतपणे विहीरीचे खोदकाम सुरु असतांनाही पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून चुपचाप बघत आहेत. तसेच वडगाव जोगे गावासाठी मंजूर झालेल्या नवीन विहिरीचे खोदकाम करण्यासाठी ज्या ठिकाणी मंजूर मिळाली आहे. ते ठिकाण सोडून दुसरीकडे खोदकाम सुरु असतांनाही संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी, डेप्युटी इंजिनिअर आशीष राठोड, ठेकेदार हे संगनमताने मनमानी कारभार करत असल्याचा आरोप अंबे वडगाव ग्रामस्थांनी केला असून या विहिरीचे अनाधिकृत खोदकाम त्वरित थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अंबे वडगाव ग्रामस्थांनी दिला आहे.