लोहारी जवळ खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात कापसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी, सुदैवाने जीवितहानी टळली.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१२/२०२२

सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील शेतकरी कापसाने भरलेला ट्रॅक्टर घेऊन पाचोरा येथे विक्रीसाठी आणतांना जामनेर ते पाचोरा रस्त्यावर लोहारी गावाजवळील रस्त्यावर असलेला खड्डा चुकवण्यासाठी प्रयत्न करत असतांनाच ट्रॉलीचा तोल जाऊन कापसासह ट्रॉली पलटी झाल्याची घटना आज दिनांक ०१ डिसेंबर २०२२ गुरुवार रोजी घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की शेंदुर्णी ते पाचोरा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून मागील दोन महिन्यांपासून या रस्त्यावरून जातांना गावागावांतील ग्रामस्थ, वाहनधारक, तसेच प्रवासी वर्ग कमालीचा त्रस्त झाले आहेत. या शेंदुर्णी ते पाचोरा रस्त्यावर असलेले खड्डे त्वरित बुजवण्यात यावे किंवा या रस्त्याचे सरसकट नुतनीकरण करण्यात यावे अशी मागणी होत असल्याने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे किंवा नुतनीकरण करण्यात यावे याकरिता कुंभकर्ण झोपेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी सत्यजितच्या माध्यमातून वारंवार आवाज उठवून रस्ता दुरुस्तीची मागणी केली जात आहे.

याबाबत पाचोरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याकडे तोंडी व भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधून रस्ता दुरुस्तीची मागणी केली परंतु संबंधित अधिकारी यांनी वारंवार आश्वासनांची खैरात देत या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी किंवा संपूर्ण रस्त्याचे नुतनीकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारे सहकार्य केले नसल्याने आज कापसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला आहे.

म्हणून आतातरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी त्वरित या रस्त्यावरील खड्डे जलद गतीने बुजवून जनतेची समस्या दूर करावी अन्यथा थोड्याच दिवसात अंबे वडगाव, वरखेडी, लोहारी, मालखेडा, भोकरी, लासुरे, सावखेडा खुर्द, सावखेडा बुद्रुक, भोजे, चिंचपूरे, पिंपळगाव हरेश्र्वर, शिंदाड येथील ग्रामस्थ व वाहनधारक हे वरखेडी रस्ता रोको आंदोलन छेडणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

मागील आठवड्यात पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाचोरा शहराकडून वरखेडी रस्त्यावर खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु हे खड्डे बुजवण्यासाठी दररोज जवळपास दहा कामगार पाठवले जात आहेत. हे दहा कामगार दिवसाला फक्त आणि फक्त एक किंवा दोन खड्डे बुजवून टंगळमंगळ करत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे पैसे व वेळ वाया जात असून नहाकच खड्डे बुजवण्यासाठीचे नाटक सुरु असल्याने तसेच हे खड्डे बुजवतांना डांबराचा वापर न करताच खड्डे बुजवले जात असल्याने हा खड्डे बुजण्याचा प्रकार म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखा असल्याने जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या