थकित बिलापोटी विद्युत वितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे अंबे वडगावची पाणी पुरवठा योजना ठप्प.
![](https://satyajeetnews.com/wp-content/uploads/2024/03/featured-image-1.jpg)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक ~२०/०५/२०२२
विद्युत वितरण कंपनीने पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव ग्रामपंचायतीकडे घेणे असलेल्या थकित बिलापोटी कडकडीत उन्हाळ्यात ऐनवेळी पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे अंबे वडगाव ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अंबे वडगाव, कोकडी तांडा व वडगाव जोगे मिळुन ग्रुप ग्रामपंचायत आहे. या तीघही गावांसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आहेत. परंतु मागील काही वर्षांपासून विद्युत वितरण कंपनीचे विद्युत बिल भरणा करण्याकडे ग्रामपंचायतीने विशेष लक्ष न दिल्यामुळे व विद्युत वितरण कंपनीकडून सूचना मिळाल्यावर थोडीफार रक्कम भरून विद्युत पुरवठा सुरू ठेवण्याचा प्रकार सुरू असल्याने या ग्रुप ग्रामपंचायत वर विद्युत वितरण कंपनीचे जवळपास वीस लाख रुपयापर्यंत थकबाकी असल्याचे खात्रीलायक समजते.
यामागील कारण म्हणजे प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आल्यानंतर संबंधित सत्ताधारी सरपंच व सदस्यांनी एका बाजूला काही प्रमाणात विकासाची कामे केली मात्र दुसरीकडे भविष्यातील येणाऱ्या समस्यांचा कोणताही विचार न करता फक्त आपले पद सांभाळले तसेच गावातील काही रहिवाशांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. परंतु ही थकबाकी वसूल करणे म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार अशी परिस्थिती होत असल्याने एकही सरपंच किंवा सदस्यांनी वसुली करण्याकडे लक्ष दिले नसल्याने गावातील रहिवाश्यांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. व विद्युत वितरण कंपनीचे बिल भरण्यासाठी ही एकमेव आर्थिक आवक आहे. मात्र वसुली होत नसल्याने विज बिल भरणे शक्य होत नसल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
एका बाजूला थकबाकी दारांच्या थकबाकी पोटी ग्रामपंचायत आर्थिक संकटात सापडल्याने विद्युत वितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केला आहे. मात्र यामुळे नियमित घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर भरणाऱ्या ग्रामस्थांना याची नहाकच झळ बसत आहे. तसेच आता जुन महिना लागणार असून शेतकरी वर्ग शेती कामात व्यस्त आहे शेतकरी व मजूर वर्ग सकाळीच शेतात गेल्यानंतर दुपारी घरी आल्यावर त्याला पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जवळपासच्या विहिरींवर जाऊन पाणी भरावे लागत आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला घरी ठेवून पाणी भरून ठेवावे लागते तसेच गावातील काही कुटुंबातून वयोवृद्ध लोकांनाही भर उन्हात पाण्यासाठी आसपासच्या विहिरींवर व गावा जावे लागत आहे.
वास्तविक पाहता ग्रामपंचायतीने सक्तीने वसुली करण्यासाठी जे ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे कर भरणार नाही त्यांच्या सवलती बंद करून सक्तीने वसुली केल्यास बरीचशी रक्कम जमा होईल तसेच ग्रामपंचायतीने जर विद्युत वितरण कंपनीचे बिल भरले तर त्या भरलेल्या बिलाची पन्नास टक्के रक्कम जिल्हापरिषद ग्रामपंचायतीला परत करते म्हणून ग्रामपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी गावातून करवसुली करुन त्वरित विद्युत वितरण कंपनीची जमेल तेवढी थकबाकी भरुन त्वरित विद्युत पुरवठा सुरू करुन पाणी पुरवठा योजना त्वरित सुरु करावा अशी मागणी केली जात आहे.
(पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्याने शेतातून थकुन आल्यावर भर उन्हात ग्रामस्थांना विशेष करुन महिलांना दैनंदिन वापरासाठी वागणारे पाणी भरण्यासाठी आसपासच्या विहीरींवर जावे लागत आहे. तसेच वेगवेगळ्या विहीरीच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत असल्याने पाणी बदल होत असल्याने लहान मुले व ग्रामस्थांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. म्हणून ग्रामपंचायतीने त्वरित थकबाकी भरुन पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली जात आहे.)