सुसज्ज अशी व्यायामशाळा व व्यायामाचे साहित्य मिळावे, कळमसरा येथील तरुणांची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०९/२०२२
पाचोरा तालुक्यात बऱ्याचशा गावांमध्ये अजुनही व्यायामशाळा व वाचनालये नसल्याने तरुण होतकरु मुलांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून खेडेगावातील प्रत्येक खेड्यात व्यायामशाळा व व्यायामाचे साहित्य तसेच वाचनालय सुरु करण्यात यावे अशी मागणी तरुण वर्गातून केली जात आहे. अशीच व्यथा पाचोरा तालुक्यातील कळमसरा गावातील तरुणांनी सत्यजित न्यूज जवळ बोलुन दाखवली आहे.
पाचोरा तालुक्यातील कळमसरा गाव हे अंदाजे पाच हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात आजच्या परिस्थितीत जवळपास २०० मुले नेव्ही, पोलीस व सैन्यदलात भरतीसाठी सराव करत आहेत. तर काही मुले चांगले कुस्तीपटू असून त्यांनी गावापासून तर राज्यपातळीवर आखाडा गाजवला आहे. विशेष म्हणजे ही मुले कष्टकरी, शेतकरी, शेतमजूरांची असल्याकारणाने त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. यामुळे फी भरणे शक्य नसल्याने ते जिममध्ये व्यायामासाठी जाऊ शकत नाहीत. म्हणून हे कळमसरा येथील नवतरुण सकाळी व संध्याकाळी मिळेल त्या रस्त्यावर जाऊन धावण्याच्या (रनिंग) करुन घेतात मात्र इतर कसरती व्यायाम करण्यासाठी त्यांना व्यायामशाळा व व्यायामाचे साहित्याची गरज भासत आहे.
कळमसरा येथे मागील काळात व्यायामशाळा बांधण्यात आली आहे. मात्र व्यायामाचे साहित्य मिळाले नसल्याने या व्यायामशाळेकडे कुणीही लक्ष न दिल्यामुळे या व्यायामशाळेवर दारुडे, जुगारी व गांजा पिणाऱ्यांनी ताबा मिळवत या व्यायाम शाळेचा अवैध वापर करून जुगाराचा अंड्डा सुरू केला होता. परंतु दोन दिवसापूर्वीच कळमसरा गावातील काही तरुणांनी या लोकांना हाकलून लावत व्यायामशाळा ताब्यात घेऊन तिची साफसफाई करून सुधारणा चे काम सुरू केले आहे.
ही व्यायाम शाळा व्यवस्थित झाल्यानंतर या व्यायाम शाळेत व्यायामाचे साहित्य त्वरित मिळावे अशी मागणी येथील तरुणांनी केली आहे. तरुणांच्या मते आम्हाला व्यायामाचे साहित्य मिळाले तर आम्ही चांगल्या प्रकारे व्यायाम करून शारीरिकदृष्ट्या दृष्ट्या सक्षम होऊन नेवी, सैन्यदल व पोलीस सेवेत सामील होऊन देश सेवा करण्यासाठी कामी येऊ असे मत व्यक्त केले तसेच व्यायाम हा प्रत्येकाने केला पाहिजे कारण शरीर हीच संपत्ती असे म्हटले जाते म्हणून फक्त नोकरी किंवा भरती करणारांनीच व्यायाम करावा असे नसून बालवयापासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनी व्यायाम केल्यास नक्कीच आपले शरीर सुदृढ सशक्त व निरोगी राहील म्हणून सगळ्यांनी व्यायामाकडे वळावे असे मत कळमसरा येथील तरुणांनी मांडले आहे. म्हणून ग्रामपंचायतीने लवकरात लवकर पाठपुरावा करू आम्हाला व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी तरुण वर्गातून केली आहे.