शितल आर्ट पाचोरा यांच्या संचालिका शीतल निशिकांत पाटील आणि प्रशिक्षणार्थी यांनी साकारली रांगोळीतून देवीची कलाकृती.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/१०/२०२१
भारतीय सण, उत्सव परंपरा आणि धार्मिकतेचा व परंपरेचा वारसा जपत अनेक सण, उत्सव साजरे केले जातात. अश्याच सण,उत्सव परंपरेतील धार्मिकता व भावना जागरुक करून स्री जातीची महती सांगणारा उत्सव म्हणजे नवरात्री उत्सव.
नवरात्री उत्सव हा आदिशक्ती दुर्गामातेचा उत्सव या निमित्ताने घटस्थापनेच्या दिवशी कलश पूजन करुन घटस्थापना करण्यात येते हा उत्सव नऊ दिवस असतो या नऊ दिवसात सकळ, संध्याकाळ देवीची पूजाअर्चा करून दररोज नैवेद्य दाखवला जातो. रात्री भजन, किर्तन, प्रवचन, भारुड असे कार्यक्रम होतात यातच महिला टिपऱ्या खेळतात. व आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन करुन आपल्यातील कलागुणांना वाव देतात.
अशीच एक कला जोपासणारी व प्रत्येकाच्या सुप्त गुणातून विविध कलागुणांना वाव देत नवनवीन कलाकार तयार करण्यासाठी सतत धडपणारी पाचोरा येथील “शितल आर्ट अकॅडमी मागील काही वर्षापासून तालुक्यातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर आपल्या कलागुणांचा ठसा उमटवत आहे.
यावर्षीही नवरात्रीनिमित्त पाचोरा येथील शितल आर्टच्या मार्गदर्शिका तथा संचालिका शीतल निशिकांत पाटील आणि त्यांचे सहकारी कु. स्नेहल जैन, कु. प्रांजल जैन, कु. निकिता मराठे, कु. अनुष्का पाटील, योगिता पाटील, अश्विनी पाटील, यांनी नवरात्री उत्सवानिमित्त डोळ्यांचे पारणे फिटेल अशी रांगोळीच्या रुपाने देवी साकारली आहे.
ही रांगोळी साकारण्यासाठी शितल पाटील यांनी त्यांच्या सहकारी महिलांना सोबत घेत तब्बल २५ तास अथक परिश्रम घेऊन लेग, पिग्मेंट व ९ किलो विविध रंगाच्या रांगोळीचा वापर करुन रांगोळी रुपाने साक्षात देवी साकारली आहे.या त्यांच्या कलाकृतीचे पाचोरा शहरासह तालुक्यातील जनतेतून कौतुक होत आहे.
ही कलाकृती कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नवकार प्लाजा येथील शितल आर्ट क्लासेस, शितल आर्ट एल ५७ बेसमेंट नवकार प्लाझा येथे साकारली असून ही कलाकृती पाहण्यासाठी शहरासह, परिसरातील, तालुक्यातील भाविक भक्तांसाठी दिनांक ८ ऑक्टोबर शुक्रवार पासून तर दिनांक १५ ऑक्टोबर शुक्रवार पर्यंत दुपारी १ ते ४ या वेळात दररोज निःशुल्क बघावयास मिळणार आहे.
तरी भाविक भक्तांनी या ठिकाणी हजेरी लावून देवीचे दर्शन घेत कलाकृती बघावी व या ठिकाणी ठेवलेल्या एका वहीत आपल्या प्रतिक्रिया नोंदवून शितल अकॅडमी व होतकरू कलाकारांच्या कलेचे कौतुक करुन पाठीवर कौतुकाची थाप देऊन कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन शितल अकॅडमी तर्फे करण्यात आले आहे.