एकीकडे म्हसाळा (कोकडी) धरणातून पाणीसाठा गुल, दुसरीकडे पाणी चोरट्यांचे शेततळे व विहिरी फुल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथून जवळच असलेल्या कोकडी तांड्याजवळ म्हसाळा (कोकडी) धरण असून या धरणावरुन कळमसरा, कुऱ्हाड, अंबे वडगाव या मोठ्या लोकसंख्येच्या गावासह कोठडी तांडा गावांसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात या धरणात जेमतेम पाणीसाठा होता व आता मृत जलसाठा शिल्लक असून अजूनही पुरेसा, समाधानकारक पाऊस झाला नसल्याने एकाबाजूला वरील चार गावांसाठी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
तर दुसरीकडे याच म्हसाळा (कोकडी) धरणातून अनाधिकृतपणे विद्युत पंप ठेवून ज्या, ज्या वेळी विद्युत पुरवठा मिळेल त्या, त्या वेळी रात्रंदिवस विद्युत पंप चालू करुन दिवसाढवळ्या पाणी उपसा करुन आपापल्या शेतातील खोल, खोल विहीर व महाकाय शेततळी तुडुंब भरुन घेतली असल्याचे दिसून येते आहे. मात्र या पाणीचोरीमुळे भविष्यात जर पाऊस लवकर नाही आला तर वरील चार गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असून मालखेडा राखीव जंगलातील जंगली प्राणी व अंबे वडगाव, कोकडी तांडा, वडगाव जोगे, मालखेडा नंतर १, मालखेडा नंबर २, कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक, कळमसरा, लोहारा, म्हसास, अंबे वडगाव तांडा नंबर १ व अंबे वडगाव तांडा नंबर २ या गावातील पशुधनाची पिण्याच्या पाण्यासाठी तारांबळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणून आतातरी पाटबंधारे विभाग, वरील चारही गावातील सरपंच तसेच विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी यांनी संयुक्तपणे पाणी चोरी, विद्युत चोरी व शासनाच्या नियमांची पायमल्ली करणारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़