पिंपळगाव हरेश्वर पोलीसांकडून सातगाव डोंगरी परिसरातील हातभट्ट्यांची तोडफोड.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०४/२०२४
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सातगाव डोंगरी परिसरात धाडसत्र राबवून पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी आज सकाळी गावठी दारुच्या हातभट्ट्यांची तोडफोड करत हजारो रुपयाचे दारु गाळण्यासाठी लागणारे रसायन व साहित्य नष्ट केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे साहेब यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांनी आज दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी सकाळी पोलीस हेडकॉन्स्टेबल रणजी दादा पाटील, जितेंद्र पाटील अभिजित निकम व पथकाला पाठवून सातगाव डोंगरी परिसरातील हातभट्ट्यांची तोडफोड करत गावठी दारुच्या निर्मितीसाठी लागणारे हजारो रुपयाचे रसायन व दारु गाळण्यासाठी लागणाऱ्या साहित्य नष्ट केले आहे.
या अचानकपणे झालेल्या कारवाईमुळे अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले असून या कारवाईबाबत सर्वसामान्य नागरिक, महिलावर्ग यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचे आभार मानले आहेत. पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी वॉश आऊट मोहीम राबवून अशीच कारवाई पिंपळगाव हरेश्वर, शिंदाड, लोहारा, कुऱ्हाड, लोहारी, कोल्हे, वरखेडी, चिंचपूरे, वडगाव आंबे, वडगाव आंबे खुर्द, वडगाव आंबे बुद्रुक व इतर गावातील अवैध दारु विक्री सह सट्टा, पत्ता, जुगाराचे क्लब कायमस्वरूपी बंद करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
कारण या अवैध धंद्यामुळे अल्पवयीन मुले, तरुण मुले, जेष्ठ नागरिक व्यसनाच्या आहारी जाऊन घरातील संसारोपयोगी वस्तू, धनधान्य विकून व्यसनपुर्ती करत असल्याने घराघरात अशांतता निर्माण झाली असल्याकारणाने महिलांना मारझोड करणे, गावात भांडणतंटे करणे यातून हाणामाऱ्या होत आहेत.
विशेष म्हणजे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदाड, चिंचपूरे, कुऱ्हाड, लोहारा व वरखेडी येथील गावठी दारुची निर्मिती करणारे काही अड्ड्याचे मालक मोठ्या प्रमाणात दारु निर्मिती करुन आसपासच्या लहान, मोठ्या खेड्यापाड्यातील गावठी दारुची अवैधरित्या किरकोळ विक्री करणाऱ्या व्यवसायिकांना कॅन चे कॅन भरुन घरपोच दारुचा पुरवठा करतात म्हणून हे दारु निर्मितीचे मोठ, मोठे अड्डे कायमस्वरूपी बंद केल्यास जवळपासच्या दहा खेड्यापाड्यातील दारु विक्री आपोआपच बंद होईल अशी माहिती समोर येत आहे.