शिंदाड येथील प्लॉट धारकांची फसवणूक, लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०६/२०२२
पाचोरा तालुक्यासह सगळीकडे सद्यस्थितीत नवनवीन वस्त्यांची निर्मिती होत आहे. खेडेगावातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून याकरिता एकत्र कुटुंबातील सदस्यांना स्वतंत्र घर जीवनावश्यक असल्याने जागा विकत घेऊन त्या ठिकाणी घर बांधणे अत्यंत गरजेचे आहे. नेमकी हिच गरज लक्षात घेऊन काही धनदांडग्या लोकांनी आपला मोर्चा खेडेगावाकडे वळवून गावाच्या आसपासच्या परिसरातील शेतजमीनी विकत घेऊन त्या जमीनीचे बिगरशेतीत रुपांतर करुन त्याठिकाणी प्लॉट टाकुन गरजूंना ते प्लॉट विकून लाखो रुपयांच्या घरात कमाई करत आहेत.
महत्वाचे म्हणजे काही खेड्यापाड्यातून शेतजमीन विकत घेऊन त्या शेतजमीत शासनाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता पैशाच्या जोरावर कायदा आमच्याच बापाचा समजून काही भ्रष्ठाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून प्लॉट टाकून त्या अनाधिकृत प्लॉटची विक्री केली जाते असल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
असाच एक प्रकार पाचोरा तालुक्यातील शिंदाड या गावात उघडकीस आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव येथील एका प्लॉट विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका इसमाने शिंदाड येथील त्याच्या ओळखीच्या व्यक्तीच्या मध्यस्थीने शिंदाड गावालगत व शिंदाड ते पिंप्री (सार्वे) रस्त्यावर शेतजमीन गट क्रमांक ६०१/१ ही शेतजमीन विकत घेऊन या जमीनीचे रितसर बिगरशेती (एन.ए.) करून याठिकाणी ७४ प्लॉटची आखणी करून शिंदाड येथील एका (एजंट) दलाला मार्फत मागील काही वर्षांपूर्वी प्लॉटची विक्री केली आहे.
विशेष बाब म्हणजे शेतजमीन घेऊन सन २०११ मध्ये बिगरशेती परवाना नसतांना प्लॉट टाकून एजंटामार्फत लकी ड्रॉ पद्धतीने प्लॉट विक्रीचा धडाका लावला होता. नंतर सन २०१३ मध्ये शेतजमीचे एन. ए. मंजूर झाले. यानंतर या प्लॉट भागात शासनाच्या नियमाप्रमाणे रस्ते, सांडपाण्याच्या गटारी, विद्युत खांब, तसेच ओपन प्लेस म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे (खुला भूखंड) ठेवून त्यावर बगिचा, खेळण्यासाठी साहित्य व इतर सुखवस्तू सोबतच सार्वजनिक प्रसाधन गृह ह्या सुविधा उपलब्ध करून देणे बांधील असतांनाच सन २०११ ते २०२२ अकरा वर्षांचा कालावधी उलटला तरीही या प्लॉट भागात संबंधित मालकाने कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नसल्याने प्लॉट धारक संतप्त झाले आहेत.
शासनाच्या नियमाप्रमाणे व प्लॉट विक्री करतांना केलेल्या करारनाम्यानुसार रस्ते व इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित जागेवरील प्लॉट धारक हे मागिल पाच वर्षांपासून संबंधित एजंट व मालकाकडे वारंवार मागणी करूनही सुविधा पुरविण्यात येत नसून उलट तुमच्याकडून जे होईल ते करुन घ्या अश्या भाषेत उत्तर मिळत नसल्याने प्लॉट धारकांची भंबेरी उडाली आहे. आता सर्व प्लॉट धारकांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले आहे म्हणून आता सगळेच्या, सगळे प्लॉट धारक कायदेशीर कारवाई करणार असल्याचे प्लॉट धारकांनी सांगितले आहे.