वडगाव आंबे गावातील अतिक्रमणामुळे प्रेतयात्रा काढणेही झाले अवघड.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०४/२०२४
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे या गावात श्री. अंबिका मातेचे मंदिर असल्याने या गावाचे नाव वडगाव आंबे असे हे गाव जामनेर, पाचोरा रस्त्यावर वसलेले मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती असून काही ग्रामस्थांनी किराण दुकान, कृषी केंद्र, कापड दुकान, कटींग सलून, हॉटेल, पानटपरी असे जीवनावश्यक व्यवसाय थाटले आहेत. तसेच या वडगाव आंबे गावचा सन १९७२ मध्ये सिटी सर्व्हे झालेला आहे.
मात्र या वडगाव आंबे गावात मागील ४० वर्षांपासून अतिक्रमण वाढत चालले असून या वाढत्या अतिक्रमणामुळे गावातील रस्ते कमालीचे अरुंद झाले असल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. हे वाढते अतिक्रमण निर्मूलन करण्यासाठी मागील काळात काही सुज्ञ नागरिकांनी आवाज उठवला होता परंतु अतिक्रमण करणारांची संख्या जास्त असल्याने व ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेले सरपंच व पदाधिकारी यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच चालले असून आतातर अतिक्रमण धारकांनी कहरच केला असून गावातील व गावाबाहेरचे रहदारीचे मुख्य रस्ते, मराठी मुलांची शाळा, धार्मिकस्थळे, ग्रामपंचायतीचे कार्यालयाजवळ, सार्वजनिक पाणवठे म्हणजे गावातील विहीर, आड याच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. विशेष म्हणजे अतिक्रमण करणारे एवढ्यावरच थांबले नाहीत तर थेट स्मशानभूमीत सुध्दा अतिक्रमण केले असल्याचे दिसून येते या अतिक्रमणामुळे लाखो रुपये खर्चून गावाच्या बाहेर बांधलेली शौचालय आज धुळखात पडली असल्याने “हगणदारी मुक्त गावांचा” फज्जा उडाला आहे.
आतातर अतिक्रमण धारकांनी कहरच केला असल्याने अगोदर ज्या, ज्या रस्त्यावरुन ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी व लहानमोठी वाहने सहज वापरत होती त्याच रस्त्यावर आता गावात पायी फिरतांनाही तारेवरची कसरत करावी लागते आहे. विशेष म्हणजे गावात काही दुर्घटना घडली किंवा कुणाला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी जर का रुग्णवाहिका आणली तर गावात रुग्णवाहिका येण्यासाठी रस्ता नसल्याने आजारी व्यक्तीला खाटेवर किंवा खांद्यावर उचलून रुग्णवाहिकेपर्यंत आणावे लागते तसेच गावत कुणाचेही निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढणे मुश्किल झाले आहे. तसेच गावातील रहिवासी शेतकऱ्यांना शेतात खते नेण्यासाठी व शेतातील शेतीमाल घरी आणण्यासाठी अडचण येत आहे. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन बऱ्याचवेळा भांडणतंटे होतात व एखाद्यावेळी काही दुर्घटना घडल्यास अग्नीशमन बंब किंवा शव वाहिनी घरापर्यंत येऊ शकणार नाही. म्हणून गावातील अतिक्रमण निर्मूलन करण्यासाठी मोहीम हाती घेणे महत्त्वाचे असल्याचे मत वडगाव आंबे गावातील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.