माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते, प्रा. सी.एन.चौधरी सरांचा गौरव.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/१२/२०२१
पाचोरा येथील पी.टी.सी. शिक्षण संस्थेच्या एम. एम. कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक तथा सकाळचे तालुका प्रतिनिधी व जेष्ठ पत्रकार प्रा. सी. एन. चौधरी सर यांची महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशनच्या जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील यांनी नियुक्ती केली.
या नियुक्तीबद्दल माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते प्रा. चौधरी यांचा गुणगौरव करण्यात आला. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रा सी एन चौधरी हे एम एम महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून ३३ वर्ष सेवा करून २०१६ मध्ये निवृत्त झाले. १ जुलै १९८६ पासून ते प्राध्यापक म्हणून सेवा बजावत होते. या काळात त्यांनी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मंजुरीने लिखाणाचा छंद जोपासण्यासाठी विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी म्हणून. काम केले .दै. बातमीदार, सकाळ, लोकमत व आता पुन्हा सकाळचे तालुका बातमीदार म्हणून ते कार्यरत आहेत.
विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी पत्रकारीतेचा छंद जोपासला व आजतागायत ते या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यांना आतापर्यंत जळगाव जिल्हा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, साहित्य साधना संघ, शिक्षक पालक संघ ,पाचोरा रोटरी क्लब, जेसिस क्लब, राजतोरण प्रतिष्ठान, पोलीस, महसूल व नगरपालिका विभाग यांच्या वतीने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासह सामाजिक व सेवाभावी कार्याबद्दल गौरविण्यात आले आहे.
ईद मिलन, गणेश मिलन यासह विविध जातीय, धार्मिक उत्सव प्रसंगी जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासंदर्भात केलेल्या कार्यामुळे त्यांना जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकां कडून गौरविण्यात आले आहे. तसेच राज्य शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानचे पाचोरा नगर परिषदेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणूनही त्यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी,१ मे निमित्ताने आयोजित शासकीय ध्वजारोहण सोहळ्याचे नियोजन व संचलन गेल्या अनेक वर्षांपासून ते यशस्वीपणे पार पाडत आहेत.
प्राध्यापक म्हणून सेवा करत असतांना त्यांनी भारत स्काऊट गाईड संस्थेचे रोव्हर स्काऊट लीडर म्हणून जबाबदारी पार पाडली. उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीचे राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक म्हणून यशस्वीपणे कामगिरी बजावली. पाचोरा- भडगाव रोटरी क्लबच्या वतीने त्यांना पाचोरा टॉप ऑफ द टेन हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या जन गणना अभियानात त्यांनी तालुका व जिल्हा स्तरावर मार्गदर्शक म्हणून कामकाज केल्याने मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
तसेच शिक्षकी व्यवसायासोबतच विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय राहिल्याने त्यांना इ.स.२००० मध्ये जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. यासोबतच पाचोरा शहर तेली समाजाच्या मंगल कार्यालय बांधकाम समितीचे उपाध्यक्ष, समाज मंडळाचे विश्वस्त सल्लागार म्हणून त्यांनी कामगिरी बजावली व सध्याही बजावत आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांची महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशनच्या जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
ही जबाबदारी ही त्यांनी स्वीकारली असून या नियुक्ती निमित्ताने माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते त्यांचा गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी पालिकेचे गटनेते संजय वाघ, उपाध्यक्ष व्ही. टी. जोशी, संचालक सतीश चौधरी, प्रकाश पाटील, प्रकाश निकुंभ, संजय सूर्यवंशी, सुनील पाटील, नगरसेवक वासुदेव महाजन, भूषण वाघ, अशोक मोरे, प्रभारी प्राचार्य डाॅ. वासुदेव वले आदी उपस्थित होते.
(ध्येय न्यूजच्या सौजन्याने.)