सत्यजित न्यूजच्या बोगस डॉक्टरांच्या बातमीमुळे पाचोरा तालुक्यातील बोगस डॉक्टरांची धावपळ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०४/२०२४
काल दिनांक १५ एप्रिल २०२४ सोमवार रोजी भोकरी येथील ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती व मासिक मीटिंगमध्ये याच विषयावर वादळी चर्चा झाली होती. याची माहिती सत्यजित न्यूजच्या हाती येताच सत्यजित न्यूज कडून (भोकरी ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये बोगस डॉक्टरांचा विषय गाजला.) या विषयावर सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.
हे वृत्त प्रसिध्दीस येताच भोकरी गावातील बोगस डॉक्टरांची चौकशी होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असले तरीही संबंधित बोगस डॉक्टरांचा दवाखाना आजही सुरुच असून त्या दवाखान्यात राजरोसपणे ॲलोपॅथीची औषधे वापरुन रुग्णावर उपचार सुरु असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. म्हणून याबाबत चौकशी होऊन कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी भोकरी ग्रामस्थांची कायम आहे.
अशातच पाचोरा शहरासह पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यात असलेल्या बोगस डॉक्टरांच्या पायाखाली वाळू सरकली असून या सर्व बोगस डॉक्टरांनी एकत्र येऊन तालुका व जिल्हास्तरावर काही राजकीय पुढाऱ्यांच्या घरी खेट्या घालणे सुरु केले असून बोगस डॉक्टरांच्या विरोधात होणारी कारवाई थांबवण्यासाठी विनवण्या करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. परंतु सुज्ञ मताच्या राजकीय मंडळींनी सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांची पाठराखण करु नये अशी सर्वसामान्य व सुज्ञ नागरिकांची विनंती आहे.
तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील वैद्यकीय अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी बोगस डॉक्टरांवर तसेच काही ठिकाणी मान्यताप्राप्त डॉक्टरांच्या नावाचा फलक लावून त्याठिकाणी काही बोगस डॉक्टर रुग्णांवर औषधोपचार करतात अशा बोगस डॉक्टर त्वरित कारवाई करुन त्यांची नावे जाहीर करावीत म्हणजे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला बोगस डॉक्टर कोण आहेत हे लक्षात येईल व ते त्या बोगस डॉक्टरांच्या उपचाराला बळी पडणार नाहीत अशी मागणी मान्यताप्राप्त डॉक्टर व सुज्ञ नागरिकांच्या माध्यमातून केली जात आहे. तसेच येत्या आठवडेभरात जर बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली नाही व बोगस डॉक्टरांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे जर एखाद्याच्या जीवावर बेतले तर याची दखल घेऊन संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.