पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बनले डोळे असून आंधळे, अपघातात वाहनधारक होत आहेत लुळे, पांगळे. (भाग,१)

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०६/२०२२
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महामार्गावर तसेच इतर जिल्हा मार्गावर रस्त्याच्या बाजूला ‘रस्ते सुरक्षितता, जीवन मरणाचा प्रश्न आहे’ असे मोठमोठे फलक लावलेले दिसून येतात. तसेच रस्त्यावर खड्डे पडले, नद्या, नाल्यावरील पुलांचे कठडे तुटले किंवा अपघाताला कारणीभूत ठरतील असे काही रस्त्यावर आढळून आल्यास याबाबींकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्याची त्वरित डागडुगी, दुरुस्ती करुन वाहतूकीत अडथळा निर्माण होणार नाही किंवा अपघात होणार नाही ही याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे.
मात्र आजच्या परिस्थितीत जामनेर व पाचोरा तालुक्यात मुख्य रस्ते तसेच इतर जिल्हा मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याकारणाने पाचोरा व जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी डोळे असून आंधळे बनले आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
कारण पाचोरा ते जामनेर महामार्ग १९ या रस्त्यावर पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील पाचोरा ते मालखेडा राखीव जंगलात पर्यंतचा अंदाजे १९ किलोमीटर रस्ता असून या रस्त्यावरील नद्यांचे पुल तसेच लहान, लहान नद्या नाल्यावर पुल बांधण्यात आलेले असून या नद्या, नाल्यांच्या पुलावरील बरेचसे संरक्षण कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच या पुलाच्या आसपासच्या भागात रस्त्यावर, तसेच साईड पट्टयावर (रस्त्याच्या पराड्यांवर) मोठ, मोठे खड्डे पडलेले असल्यामुळे या रस्त्यावरुन वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
असाच काहीसा प्रकार पाचोरा ते जामनेर रस्त्यावर वरखेडी बसस्थानक ते जामनेर, पाचोरा (पी.जे.) रेल्वे फाटकापर्यंत ठिकठिकाणी खड्डे पडलेले असल्यामुळे तसेच वरखेडी आठवडे बाजाराच्या पुलाजवळ साईड पट्टयावरील दगड व माती निघून गेल्याने डांबरीकरणाच्या जवळजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असल्यामुळे याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या खड्डे पडलेल्या ठिकाणाहून काही दुचाकीस्वार व सायकलस्वार रस्त्यावरुन खाली उतरतात किंवा भरधाव वेगाने वाहने चालवत खालून वर चढतात यामुळे बऱ्याचवेळा अपघात झालेले आहेत व आजही अपघातांची मालिका सुरुच आहे.
म्हणून पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रस्त्यावरील खड्डे व कपड्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.