दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/११/२०२२

(पिंपळगाव हरेश्र्वर गावात दहाच्या जवळपास गुटखा विक्री करणारे ठोक विक्रेते असून हे ठोक विक्रेते वरसाडे तांडा नंबर एक, दोन, कोल्हे, डांभुर्णी अटलगव्हान, भोजे व पिंपळगाव हरेश्र्वर गावातील पानटपरी व किरकोळ विक्रेत्यांना शासनाने बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा विकतात व यांना कुणी हटकल्यास आम्ही वरपर्यंत हप्ते देतो अशी उर्मट भाषा वापरुन समोरच्या व्यक्तीला दबावाखाली घेत असल्याने ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. )

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून या गावात माध्यमिक, उच्चमाध्यमिक विद्यालय तसेच जिल्हापरिषद मराठी मुलांची शाळा, तलाठी, ग्रामपंचायत, भुमी अभिलेखा कार्यालय, पोलीस स्टेशन, शासकीय रुग्णालय असल्याने तसेच भाजीपाला व फळे उत्पादक शेतकरी असल्याने दर मंगळवारी भरणारा आठवडी बाजार या कारणांमुळे गावात बाहेरगावाहून येणारे विद्यार्थी तसेच विविध कामानिमित्ताने येणारे ग्रामस, ग्राहक मोठ्या प्रमाणात असल्याने पिंपळगाव हरेश्र्वर गावाची बाजारपेठ गजबजलेली असते यामुळे ग्राहकांची संख्या भरपूर असल्याने याच संधीचा फायदा घेत या गावात सट्टा पेढ्या, जुगाराचे अड्डे हे अवैध धंदे तसेच किराणा दुकान, पानटपरी, उपहारगृह अश्या ठिकाणी शासनाने बंदी घातलेल्या तंबाखूजन्य गुटखा, आल्या, पानमसाला गुटखा याची खुलेआम, दिवसाढवळ्या विक्री होतांना दिसून येते असल्याने पिंपळगाव हरेश्र्वर हे गाव अवैध धंद्यांचे माहेर घर तर बनले नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे अन्न व सुरक्षा मानदे कायदा २००६ विनियमन २०११ नुसार गुटखा विक्री करणे किंवा वितरण करणे गुन्हा ठरतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन हा स्वतंत्र विभाग आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात २०१२ पासून गुटखा बंदी करण्यात आली असली तरी सर्वदूर छुप्या मार्गाने शहरात अवैध गुटखा विक्री सुरूच आहे. ठिकठिकाणी पानविक्री करण्याऐवजी घातक तंबाखूचा खर्रा, गुटख्याच्या पुड्या, सुगंधित तंबाखू, पानमसाल्याची विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे तरुणाई व्यसनाधीन होत असून त्यांना कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे लागत असल्याने पाचोरा शहरातील व तालुक्यातील अवैध रीत्या सुरु असलेली गुटखा विक्री अन्न व औषध प्रशासनातर्फे त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी पिंपळगाव हरेश्र्वर येथील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

तसेच आजपर्यंत अन्न व औषध प्रशासनाने पानटपरी किंवा किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई केली आहे व अधुनमधून किरकोळ विक्रेत्यांवर बऱ्याच वेळा कारवाई करतांना मोठा गाजावाजा करण्यात येतो मात्र होलसेल गुटख्याची विक्री करणाऱ्या गुटखा किंगवर अद्यापही कोणतीही कारवाई केली जात नसल्याने अन्न व औषध प्रशासन विभागातील (एफ. डी. एस.) अधिकारी हे आतून किर्तन बाहेरुन तमाशा करुन जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत नाही ना ? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

टिप~
आज सकाळी सत्यजितच्या माध्यमातून पाचोरा शहरासह तालुक्यात दिवसाढवळ्या गुटखा विक्री सुरु असल्याचे वृत्त देण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेऊन पिंपळगाव हरेश्र्वर येथील काही सुज्ञ नागरिकांनी व समाजसुधारक व समाजसेवकांनी सत्यजित न्यूजकडे भ्रमणध्वनीवर संपर्क साधून गुटखा बंदी करण्यासाठी आवाज उठवल्याबद्दल आभार मानले व पिंपळगाव हरेश्र्वर गावातील अवैध धंदे व गुटखा विक्री बंद करण्यासाठी आमच्या मागण्या व भावनांचा आपण सत्यजित न्यूजच्या माध्यमातून शासनदरबारी कळवाव्यात अशी विनंती केली त्या विनंतीनुसार अन्न व औषध प्रशासन, कायद्याचे रक्षक यांच्याकडे सत्यजित शहा माध्यमातून हा आमचा छोटासा प्रयत्न.