पाचोरा तालुक्यात मुरुम, माती, दगड, वाळू सह इतर गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात चोरी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील मोठ्या शहरालगत तसे गाव, खेडेगावातील शेत शिवार, धरण परिसरातून, गावरान जमीन व इतर सरकारी तसेच निमशासकीय जमीनीवर अनाधिकृतपणे शासनाची कोणतीही रीतसर परवानगी न घेता (महसूल) न भरताच उत्खनन (खोदकाम) करुन दररोज हजारो ब्रास, मुरुम, माती, वाळू, दगडासह इतर गौण खनिजांची मोठ्या प्रमाणावर उचल करुन हे गौण खनिज परस्पर विक्री करुन या व्यवसायातून ट्रॅक्टर व जेसीबी मालक दररोज हजारो रुपयांची कमाई करत आहेत.
हे अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व उचल दिवसाढवळ्या व रात्रंदिवस सुरु असून या उत्खननामुळे गावागावांतील गावठाण जमीन, गायराण जमीन, तहसील हद्दीतील जमीनीवर मोठमोठे खड्डे पडत आहेत. थोडक्यात याठिकाणी खदान तयार होत आहेत. तसेच धरण, पाझर तलाव व नालाबांध या भागात उत्खनन (खोदकाम) करतांना कोणत्याही गोष्टींचा विचार केला जात नसल्याने हे उत्खनन करतांना थेट धरण्याच्या भिंतीच्या पायाजवळ, धरणाच्या सांडव्याजवळ तसेच नालाबांधाच्या थेट भिंतीजवळ केले जात असल्याने यामुळे धरणाची भिंत, सांडवा, नालाबांधाची भिंत याला क्षती पोहचून पुढील अनर्थ घडण्याची शक्यता टाळता येत नाही.
हे सुरु असलेले अवैध उत्खनन व विनापरवानगी गौण खनिजांची उचल तसेच परस्पर विक्री होत असल्याने शासनाचा लाखो रुपये महसूल बुडत असून गौणखनिज नष्ट होत आहे. म्हणून गौण खनिज चोरी करणाऱ्या ट्रॅक्टर मालक, जेसीबी मालक संबंधित जबाबदार व्यक्तीवर रीतसर कारवाई करण्यात येऊन दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.