पाचोरा शहरात “भारत बंद” ला संमिश्र प्रतिसाद.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०५/२०२२
राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओ.बी.सी.) मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल चौधरी यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक मुद्यांवर आधारित चरणबद्ध आंदोलन केले जात आहे. यापूर्वी धरणे आंदोलन आणि रॅली प्रदर्शन करण्यात आले असून त्याआधारे दिनांक २५ मे २०२२ बुधवार रोजी एकदिवसीय “भारत बंद” आंदोलन करण्यात आले. यादिवशी पाचोरा शहरात सकाळ पासुनच छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड, रेल्वे स्टेशन रोड, राजे संभाजी महाराज चौक, बस स्थानक रोड, भडगाव रोड, जारगाव चौफुली, भारत डेअरी स्टाॅप, जळगांव चौफुली येथे अत्यावश्यक सेवा वगळता संमिश्र प्रतिसाद दिसुन आला.
या आंदोलनासाठी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील विविध संघटनांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. सदरील भारत बंदचे केंद्र सरकार विरोधात पुढील विविध सामाजिक मुद्यांवर आधारित करण्यात आले आहे. केंद्र सरकार द्वारा इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) ची जातनिहाय जनगणना करणेसाठी, EVM (ई.व्ही.एम.) घोटाळ्याच्या विरोधात व ईव्हीएम बंद करुन बैलेट पेपरवर निवडणुका घेणेसाठी, खाजगी क्षेत्रामध्ये एस.सी., एस. टी., ओ.बी.सी. आरक्षण लागू करणेबाबत, M.S.P. (एम.एस.पी.) गॅरंटी कायदा बनवून शेतकऱ्यांना न्याय देणेसाठी, एन. आर. सी. / सी. ए. ए. / एन. पी. आर. च्या विरोधात, जूनी पेंशन योजना लागु करणेसाठी, मध्यप्रदेश, ओडीसा आणि झारखंड मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र मतदार संघ लागू करणेसाठी, पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली आदिवासींना जल, जंगल व जमीन यापासुन विस्थापित करण्याच्या विरोधात, जबरदस्ती दबाव आणून करण्यात येत असणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या विरोधात, लॉकडाऊन काळात कामगारांच्या विरोधात बनविलेल्या श्रमिक कायद्याच्या विरोधात सदर मुद्दे जनसामान्य ओ. बी. सी., एस. सी., एस. टी., अल्पसंख्यांक यांच्या सामाजिक हितासाठी एकदिवसीय “भारत बंद” आंदोलन करण्यात आले. आंदोलनात राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओ. बी. सी.) मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे सह पदाधिकारी रस्त्यांवर उतरुन दुकानदारांना बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा मा. नगरसेवक विकास पाटील, बशिर बागवान, अशोक मोरे, वासुदेव महाजन, अॅड. अविनाश भालेराव, समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंगरे, सोशल मिडिया प्रमुख नंदलाल आगारे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तालुका अध्यक्ष हमिद शहा, रिपाइंचे विभागीय अध्यक्ष भालचंद्र ब्राह्मणे, बल्लाळेश्वर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे अॅड. रणजीत तडवी, तालुका अध्यक्ष जाकीर तडवी, आनंद बागुल, माळी समाज अध्यक्ष संजय महाले, न्हावी समाज अध्यक्ष रमेश जाधव, नसिर बागवान सह आदि उपस्थित होते.