रेल्वे अपघातात मृत झालेल्या तरुणाची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख पटली.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०५/२०२३
पाचोरा रेल्वे स्थानका जवळ निजामुद्दीनहुन हुबळीच्या दिशेने जाणाऱ्या सुपर फास्ट एक्सप्रेस समोर आल्याने एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना २९ मे २०२३ सोमवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली होती. रेल्वे प्रशासनाकडून या घटनेची माहिती घेत मयत झालेल्या तरुणाचा फोटो व वर्णन घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून मयताची ओळख पटवण्याचे आवाहन पाचोरा लोहमार्ग पोलीस दूरक्षेत्रचे ए. एस. आय. ईश्वर बोरुडे केले होते. यानुसार सोशल मीडियावर तरुणाचा फोटो व अपघात मृत झाल्याचे वृत्त पहाताच संबंधित मयत तरुण हा सुनिल मन्साराम सोनवणे (वय २५) रा. वाघुलखेडा ता. पाचोरा येथील असल्याचे उघडकीस आले होते.
या माहितीच्या आधारे सुनील सोनवणे यांच्या कुटुंबियांनी सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली व प्रत्यक्ष पाहिले असता तो मयत तरुण सुनील मंन्साराम सोनवणे असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत मयत सुनील याच्या परिवाराशी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेतली असता मयत सुनील याने सकाळी दहा वाजता कपडे घेण्यासाठी पाचोरा जात असल्याचे घरच्यांना सांगून तो घरातून बाहेर पडला होता. तो उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे आम्ही चिंतेत असतांना याच वेळात सोशल मीडियावर आलेल्या फोटोसह बातमीमुळे आम्हाला माहीत झाल्याचे सुनीलच्या कुटुंबीयांनी सांगितले.
मयत सुनील सोनवणे याच्या पाश्चात वयोवृद्ध आई, वडील, दोन बहिणी असा परिवार असून सुनील हा सोनवणे परिवाराचा एकुलता, एक मुलगा असल्याने संपूर्ण पंचक्रोशीतील गावागावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच सोनवणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.