महिला राज नावाला अन पतीराज छळतात गावाला. शेंदुर्णी येथे उपनगराध्यक्षांच्या पतीविरुध्द गुन्हा दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०५/२०२१
सगळीकडे महिला सबलीकरण व्हावे तसेच महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने न्याय मिळावा म्हणून शासनाने महिलांसाठी विविध योजना व उपक्रम राबविले व राजकारणात समसमान अधिकार मिळावेत म्हणून महिलांना राखीव जागा देऊन एकप्रकारे न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असले तरीही आजही महिलांच्या नावाखाली पुरुष मंडळीच पुढे असतात असे दिसून येते व असाच काहीसा प्रकार जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील नगरपंचायतीच्या कारभारात दिसून आला असून नगरपंचायतीच्या सफाई कामगाराच्या शर्टची कॉलर पकडून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी शेंदुर्णी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांच्या पतीविरुध्द पहूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक ०६ मे गुरुवारी सायंकाळी अंदाजे सव्वापाच वाजेच्या सुमारास पारस चौकातील राष्ट्रमाता जिजाऊ पतपेढी संस्थेसमोर उपनगराध्यक्षा सौ.चंदाबाई अग्रवाल यांचे पती व भा.ज.पा.जिल्हा उपाध्यक्ष श्री.गोविंद अग्रवाल यांनी नगरपंचायतीचे सफाई कामगार अरुण पंढरी सकट वय वर्षे २९ यांच्या शर्टाची कॉलर पकडून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत तुम्हाला ड्यूटी वरुन कमी करतो अशी धमकी दिल्याची घटना घडली आहे.
याबाबत शेंदुर्णी नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी अरुण पंढरी सकट यांनी पहूर पोलिस स्टेशनला या घटनेबाबत रितसर तक्रार दाखल केली असून सी.सी.टी.एन.एस.गुन्हा रजिस्टर नंबर १५२/२०२१ भादवी कलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१) (ठ) (ड) सह भादवी कलम ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी मा.श्री. भरत काकडे करीत आहेत.
तसेच नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा यांचे पती यांचा नगरपंचायतीचे कामकाजात काही एक संबंध नसतांना ते आमच्यावर विनाकारण हुकुमत गाजवत असून ते आमच्यावर नेहमीच दबाव टाकत असतात. व अश्याच प्रकारे त्यांनी दिनांक ०६ मे गुरुवार रोजी आमच्या कर्मचाऱ्यापैकी श्री. अरुण पंढरी सकट याची कॉलर पकडून ओढाताण करत जातीवाचक शिवीगाळ केली. सोबतच आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना आमच्या जातीचा उल्लेख करुन शिवीगाळ केली. तसेच सी.ई.ओ.साहेबांना सांगुन तुमच्या विरुद्ध नोटीस काढण्यास सांगतो असा दम भरला या सर्व जाचास आम्ही कंटाळलो असून आम्हाला यांच्यापासून होणारा त्रास थांबवण्यासाठी यांच्यावर कडक कारवाई करुन बंदोबस्त करावा व आम्हाला न्याय मिळवून द्यावा असा विनंती अर्ज नगरपंचायतीचे सफाई कामगार व फिर्यादी अरुण पंढरी सकट यांनी पहूर पोलिस स्टेशनला दिला असल्याचे समजते.