कुऱ्हाड गावात दारुडे घेतात लोटांगण, अवैधधंदे करणारांचे कोण करते पाठराखण. अवैधधंदे करणारे पोलिस कारवाईलाही जुमानत नसल्याचे चित्र.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०८/२०२१
[अवैधधंदे करणारांना हद्दपार करण्यात यावे अशी कुऱ्हाड ग्रामस्थांची एकमुखी मागणी.]
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड हे गाव अवैधधंद्याचे माहेर घर बनले आहे असे म्हटले तर आजच्या घडीला वावगे ठरणार नाही. कारण कुऱ्हाड येथील अवैधधंदे बंद करण्यासाठी कुऱ्हाड येथील सुज्ञनागरीक व महिलावर्गाकडून मागील पाच वर्षापासून पाठपुरावा सुरु असल्यावरही या गावातील सट्टा, पत्ता, जुगार, गावठीदारु व देशीदारुची अवैध विक्री थांबता थांबत नसून आजपर्यंत या गावातील बरीचशी कुटुंब बरबाद झाली असून आजही बरीचश्यि कुटुंबातील व्यसनाधीन लोक बरबादीच्या मार्गावर आहेत.
मागील महिन्यात एका तरुणाने जुगारात पैसे हारल्यावर जुगाराच्या अड्डा मालकाने धमकी दिली म्हणून एका अठरा वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून त्याचे कुटुंबीय न्याय मिळवण्यासाठी दारोदार फिरत आहेत.
तर दुसरीकडे आजही सर्वप्रकारचे अवैधधंदे राजरोसपणे सुरु असल्याने आसपासच्या पाच खेड्यातील व्यसनाच्या आहारी गेलेले लोक कुऱ्हाड येथे येऊन धिंगाणा घालत असल्याने ऐन संध्याकाळी बसस्थानक परिसर ते खंडेराव महाराज मंदिरापर्यंत दारुड्यांची यात्रा भरत असल्याने सकाळी व संध्याकाळी शेतात जाणाऱ्या व येणाऱ्या महिलांना या दारुड्यांचा उपद्रव सहन करावा लागत आहे.
कालच पिंपळगाव हरेश्वरच्या पोलिसांनी अवैधधंदे करणारांच्या घरावर धाडसत्र राबविले मात्र पाहिजे तेवढे यश आले नाही. विशेष म्हणजे धाडसत्र राबवून पोलिस गावाबाहेर पडताच अवैधधंदे पुन्हा सुरू झाले. तसेच एका अवैधधंदे करणाराचे टाळके फिरल्याने त्याने भररस्त्यात पोलिसांना शिवीगाळ करत तोंडसुख घेतल्याने जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात होते.
आज दिनांक १७ ऑगस्ट मंगळवार रोजी बऱ्याच दिवसानंतर पावसाने हजेरी लावली मोठ्या प्रमाणात पाऊस येऊन नद्या, नाल्यांना पुर येईल असे अपेक्षित असतांनाच पाऊस जेमतेम झाला मात्र दुसरीकडे दारुचा महापूर आल्यामुळे दारुडे रस्त्यावर पडलेले दिसून येत आहेत.
{पोलिसांना साकडे~ कुऱ्हाड गावातील सर्वप्रकारचे अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पोलिसांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता सातत्याने कारवाई करावी असे साकडे घातले असून कुऱ्हाड गावातून अवैधधंदे कायमस्वरूपी हद्दपार झाल्यास सत्कार करण्यात येईल असे जाहीर केले आहे. }