पाचोरा तालुक्यातील बोगस डॉक्टरांना राजकीय पक्षांचे सुरक्षाकवच.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०४/२०२४
सद्यस्थितीत आपापली सत्ता टिकवण्यासाठी राजकीय पक्ष प्रमुखांनी कंबरेचे सोडून डोक्याला बांधले आहे. मग याकरिता वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून लबाड, भ्रष्टाचारी, गुंडांना कधी ईडी, सिडीचा तसेच वेगवेगळ्या चौकश्या लावून धाक दाखवून आपल्या पक्षाच्या दावणीला बांधून घेतले आहे. यामुळे या सर्वांच्या चौकश्या होऊन कायदेशीर कारवाई न झाल्यामुळे आता सर्व लबाड, भ्रष्टाचारी, गुंडाना अजूनच रान मोकळे झाले असून एकाबाजूला निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांनाच दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वप्रकारचे अवैध धंदे दिवसेंदिवस वाढत चालले असून दिवसाढवळ्या खून, दरोडे, बलात्कार, अपहरण, गोळीबार यासारखे गुन्हे घडत आहेत. अशाही परिस्थितीत पोलीस प्रशासन व इतर सुरक्षायंत्रणा इमानेइतबारे काम करत असतांनाही निवडणुकीत या अवैध धंदे करणारांचा वापर करुन घेण्यासाठी (काही) राजकीय पक्ष व पक्षाचे ज्येष्ठ नेते यांना पाठीशी घालत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
हा प्रकार येथेच थांबला नसून याची किड आता वैद्यकीय क्षेत्रातही लागली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून तसे चित्र डोळ्यासमोर दिसून येत आहे. याबाबत सविस्तर बोलायचे झाल्यास पाचोरा शहरासह तालुक्यातील गावागावात बोगस डॉक्टरांनी धुमाकूळ घातला असून हे बोगस डॉक्टर स्वताला एम. बी. बी. एस. समजून बिनधास्तपणे ॲलोपॅथी औषधांचा वापर करुन रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळत असल्याने सुज्ञ नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. कारण हे बोगस डॉक्टर ज्या ॲलोपॅथी औषधाचा वापर करतात त्या औषधी मध्ये कोणते घटक (contents) आहेत त्या घटकांचा शरीरावर काय परिणाम (Effect) होतो याची थातूरमातूर माहिती आहे परंतु या औषधांचा वापर करतांन रुग्णांचे वय, वजन, शारीरिक क्षमता यांचा कुठेही ताळमेळ न लावताच औषधोपचार केले जातात या मुळे बऱ्याच रुग्णांना दुष्परिणामांना (Side effect) सामोरे जावे लागत असून या चुकीच्या औषधांमुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो हे नाकारता येणार नाही.
म्हणून या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली पाहिजे म्हणून काही तज्ञ डॉक्टर व सुज्ञ नागरिकांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना भेटून या बोगस डॉक्टरांच्या विरोधात आवाज उठवला आहे. याची दखल घेऊन सत्यजित न्यूज कडून सतत वृतांकन करण्यात आले आहे. तरीही आजपर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व इतर जबाबदार विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाचोरा शहरातील व गावागावांतील बोगस डॉक्टरांची माहिती काढून अद्यापही कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचे दिसून येत आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता पाचोरा शहरातील व गावागावांतील बोगस डॉक्टरांनी कोणत्या ना कोणत्या पक्षाचे झेंडे हातात घेऊन पक्षात सामील होऊन आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचे भासवून पक्षप्रमुखांना विश्वसात घेऊन तालुकाध्यक्ष, संघटना प्रमुख, गटप्रमुख, गण प्रमुख, शाखाप्रमुख अशी विविध पदरात पाडून घेतल्यानंतर या पदांच्या पाट्यांची ढाल बनवून जिल्हा व तालुकास्तरावरील चौकशी अधिकाऱ्यांवर दबाव आणून किंवा आरोग्य विभागातील कुणीही चौकशीसाठी आल्यावर आपल्या पक्षश्रेष्ठींना फोन लाऊन कारवाईत खोडा घालुन आपला बचाव करुन घेत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
हा प्रकार असाच सुरु राहिल्यास एखाद्यावेळी चुकीच्या उपचारपद्धतीमुळे गरजु रुग्णांना आपला जीव गमवावा लागू शकतो अशी भिती व्यक्त करत या बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात येऊन यांची नावे जाहीर करण्यात यावी म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होऊन आरोग्याशी खेळला जाणारा खेळ थांबेल अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.