रोहिणीताई खडसे हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा दाखल,अद्याप कुणालाही अटक नाही.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/१२/२०२१
रोहिणीताई खडसे यांच्या वाहनावर चांगदेवजवळ हल्ला, घटनेमुळे परिसरात तणाव.
जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह इतर चार अनोळखी व्यक्ती अशा सात जणांविरुद्ध मंगळवारी २८ रोजी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये शिवसेना विधान सभाक्षेत्र प्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख छोटू भोई आणि चांगदेव ग्रामपंचायत सदस्य पंकज कोळी यांचा समावेश आहे.
रोहिणी खडसे या चांगदेव येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर मुक्ताईनगरकडे येत असतांना सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजता माणेगाव फाट्याजवळ त्यांच्या कारसमोर (एमएच १९ सीसी-१९१९) चार मोटारसायकलवरुन आलेल्या हातात तलावर, पिस्तूल व लोखंडी रॉड असलेल्या सात हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा चालक होता. या हल्ल्यात रोहिणी खडसे यांना सुदैवाने कसलीही दुखापत झालेली नाही. हल्ला केल्यानंतर काही क्षणातच हल्लेखोर पळून गेले होते.
या घटनेमुळे मुक्ताईनगरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात येऊन घटनेचा निषेध केला. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे देखील पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी रोहिणी खडसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसात शिवसेनेचे पदाधिकारी छोटू भोई, सुनिल काशिनाथ पाटील (दोघे रा. मुक्ताईनगर ), पंकज कोळी (रा. चांगदेव) आणि ४ अनोळखी व्यक्तींविरोधात दंगलीचा तसंच हत्यार प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली असून याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगत अद्याप कुणालाही अटक केली नसल्याचेही त्यांनी सांगितले.