वावडदा शिवारात बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उध्वस्त एकाला अटक दोन जण फरार, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०८/२०२१
जळगाव येथून जवळच असलेल्या वावडदा शिवारात राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने धाड टाकून सुमारे २ लाख ६० हजार रुपयांचा देशी विदेशी मद्याचा बनावट साठा आणि दारूसाठी लागणारे रसायन जप्त करण्यात आले असून एकाला अटक करण्यात आली आहे. तसेच तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, वावडदा शिवारात म्हाळसाई क्रशींग कंपनीजवळ गेल्या दोन ते तीन महिन्यापासून देशी विदेशी बनावट दारु निर्मीतीचा कारखाना सुरु होता. जळगाव राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पोलीस अधिक्षक सिमा झावरे यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन, काल गुरूवारी ५ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० ते १२.३० वाजेच्या दरम्यान म्हाळसाई क्रशींग कंपनीजवळ एका घरावर त्यांनी छापा टाकला असता त्याठिकाणी बनावट कारखाना सुरू असल्याचे दिसून आले.
यासंदर्भात येथील वाचमन व त्याची पत्नी राहत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. परंतु गोपनीय मिळालेली माहिती शंभर टक्के सत्य असल्याने संपुर्ण तीन ते चार खोल्यांची तपासणी केली असता त्याठिकाण बनावट दारू तयार करण्यासाठी कच्चे साहित्य, काचेच्या बाटल्या, बुच, पाण्याच्या बाटल्या, पाण्याचे जार, कॅन्स, बनावट दारूच्या सीलबंद बाटल्या असा मुद्देमाल आढळून आला. यात १ लाख ३१ हजार ४६० रूपये किंमतीच्या बनावट देशी टँगो (१८०एमएल)च्या २ हजार १९१ बाटल्या, ७५ हजार ३०० रूपये किंमतीच्या मॅकडोवेल नं१ (१८०एमएल)च्या ५०२ सीलबंद बाटल्या, ३ हजार ५०० रूपये किंमतीच्या दोन ३५ लिटर ड्रम (मद्यार्क भरलेला), १४ हजार किंमतीचे बॉटलिंग मशिन, १६ हजार रूपये किंमतीचे बुच, ७०० किमतीच्या रिकाम्या बाटल्या, मद्यार्कचे दोन ड्रम, उपकरण, इतर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू असा एकुण २ लाख ६० हजार १० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात संशयित आरोपी वाचमन संजय रमन देवरे (वय-५०) रा. वावडदा ता.जि.जळगाव याला पोलीसांनी अटक केली आहे. यासह राहूल चौधरी आणि गौतम माळी (पुर्ण नाव माहित नाही) हे फरार आहे. तिघांवर दारूबंदी कायद्या अधिनियम कलम (६५ ब, ड, ई, एफ, ८३, ८६, ९०, ९८) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांचा होता कारवाईत सहभाग
नाशिक विभागीय आयुक्त अर्जून ओहोळ, पोलीस उपअधिक्षक सिमा झावरे, भरारी पथकाचे मुख्य निरीक्षक सी.एच.पाटील, दुय्यम निरीक्षक सत्यविजय ठेंगडे, दुय्यम निरीक्षक विकास पाटील, आनंद पाटील, अजय गावंडे, योगेश राठोड, नितीन पाटील, मुकेश पाटील, कुणाल सोनवणे यांनी ही कारवाई केली.