सोयगावच्या लाकुड व्यापाऱ्याचा पाचोरा तालुक्यात धिंगाणा, पिंपळगाव हरेश्वर येथे हिरव्यागार झाडाची कत्तल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०३/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर, शिंदाड, कडे वडगाव, वरसाडे या भागातील शेत शिवारात तसेच गावठाण हद्दीत सोयगाव येथील एका लाकूड व्यापाऱ्याने धुमाकूळ घातला असून हिरव्यागार झाडांची दिवसाढवळ्या कत्तल सुरु आहे. सोयगावच्या लाकूड व्यापाऱ्याने या परिसरातील हिरव्यागार झाडांची कत्तल सुरु केल्याने निसर्गप्रेमींनी संतप्त प्रतिक्रिया देत हिरव्यागार झाडांची कत्तल थांबवण्यासाठी कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
तसेच दिनांक १६ मार्च मंगळवार रोजी पिंपळगाव हरेश्वर येथील बेलदार वाडी परिसरातील संजय गिरधर धनगर व प्रशांत दगडू माळी यांच्या खळवाडीतील तारेच्या कुंपणाजवळील सामाईक असलेले जुने लिंबाचे हिरवेगार झाड संजय गिरधर धनगर यांनी सोयगावच्या लाकुड व्यापाऱ्याला विक्री करुन हिरव्यागार झाडाची दिवसाढवळ्या स्वयंचलित यंत्राच्या साह्याने कत्तल केली.
याबाबतीत प्रशांत दगडू माळी यांनी संजय धनगर व लाकूड व्यापाऱ्याला विनंती केली की तुम्ही हे झाड कापू नका आम्हाला गुरेढोरे बांधायला सावली रहाणार नाही. परंतु संबधित लाकूड व्यापाऱ्याने काहीएक न ऐकता झाड कापायला सुरवात केली. म्हणून प्रशांत माळी यांनी हरकत घेताच संजय धनगर यांनी प्रशांत माळी यांना भरचौकात शिविगाळ करत मी झाड कापले आहे. तुला जे करायचे असेल ते कर असे सांगत दम भरला. या हिरव्यागार झाडाची कत्तल झाल्यामुळे गुराढोरांची सावली तर गेलीच सोबतच प्रशांत माळी यांनी खळ्यासाठी केलेले तारेचे कुंपणाचे नुकसान झाले आहे.
या बाबतीत प्रशांत माळी यांनी पाचोरा वनविभागाकडे तक्रार देण्यासाठी संपर्क साधला परंतु वनविभागाची जळगाव येथे तातडीची मिटींग असल्याने तक्रार दाखल करता आली नाही. परंतु प्रशांत माळी हे लवकरच तक्रार दाखल करणार असल्याचे समजते.