निंभोरी येथे आचारसंहितेचा भंग; पाचोरा तहसिलदारांकडे तक्रार
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०१/२०२१
पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरी बु॥ येथे आचारसंहितेचा भंग झाल्यासंदर्भात तहसीलदार यांच्याकडे तक्रार नुकतीच दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील निंभोरी बु॥ येथील वार्ड क्र. ३ मधील रहिवासी असलेले रवींद्र नलावडे यांनी वार्ड एक मधील मतदार एम.जी. परशुराम राठोड यांना त्यांच्या मोबाईलवरून कॉल करून मी एक नं वार्डातील छत्री, टेबल व बादली या चिन्ह असलेल्या उमेद्वारांसाठी पैसे वाटून ५० मतदान फिक्स केले असून तुला व तुझ्या पत्नीला प्रत्येकी एक हजार रुपये देईल. तुझे हे मतदान धरून ५२ मते होणार आहेत. मात्र मी तुला फोन केल्याबाबत कुणासही काही एक सांगू नको, या बाबत तुला साई बाबांची शप्पथ देत आहे. कारण वार्ड एक मधील यशोदाबाई सरदार जाधव या उमेदवार तुझ्या जवळचा नात्यातील आहे.
अश्या आशयाचा रवींद्र नलावडे यांनी ९८९०४१२५६१ या क्रमांकावरून दिनांक १४ गुरुवार रोजी दुपारी १:२३ वाजता फोन केलेला असून एम जी राठोड यांनी ते संभाषण रेकॉर्ड केले आहे. यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याने एम. जी. राठोड यांनी दि. १७ रोजी तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे तक्रारी अर्ज व संभाषणाची सी.डी. व ऑडिओ क्लिप सुपुर्द केली आहे. यावेळी एम. जी. राठोड, कैलास राठोड, लक्ष्मण पवार, जगन राठोड, अनिल जाधव, अर्जुन राठोड उपस्थित होते. तक्रार दाराने निवेदनाची प्रत पिंपळगाव (हरे.) पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक निता कायटे यांनाही दिल्या आहेत. पैसे देऊन मतदान विकत घेतल्याने आचारसंहितेचा भंग झालेला आहे. तक्रारदार याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रार दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे.