वडगाव आंबे येथे एकाचा उष्माघाताने मृत्यू, यात्रोत्सवावर शोककळा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०४/२०२४
वडगाव आंबे येथील एका शेतमजूराचा अति मध्य सेवन व उष्माघाताने मृत्यू झाल्याचे घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की वडगाव आंबे येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने अंबिका मातेचा यात्रोत्सव असल्याने गावातील सर्व समाजबांधवांकडे पाहुण्यांची वर्दळ सुरु होती. याच यात्रोत्सव निमित्ताने बापू समशेर तडवी यांच्याकडेही गुढीपाडवा उत्सव साजरा करण्यात येत होता.
बापू समशेर तडवी हा जंगलातून मध संकलन करुन गावात विक्री करुन दोन पैसे कमावत असल्याने तो सकाळपासूनच जेवण न करता दिवसभर जंगलात मध संकलन करण्यासाठी गेला होता. तो सायंकाळी साडेपाच वाजले तरी बापू हा घरी न आल्यामुळे घरची मंडळी चिंतेत होती. याच वेळात सालाबादप्रमाणे बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर काही ग्रामस्थ हे श्री. महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले असता मंदिरापासून काही अंतरावर बापू हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसून आला म्हणून त्याला गावकऱ्यांनी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत घोषित केले आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता बापू समशेर तडवी हा सकाळपासून उपाशीपोटी भर उन्हात भटकंती करत होता यामुळे उपाशीपोटी दारु उन्हात फिरवल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.