कुऱ्हाड शिवारात बिबट्याने घेतला वासराचा बळी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०४/२०२४
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे, कुऱ्हाड, कळमसरा, लोहारा तसेच जामनेर तालुक्यातील मालखेडा शिवारात मागील महिन्यापासून बिबट्याचा वावर वाढला असून या बिबट्याने आजपर्यंत बऱ्याचशा पाळीव व जंगली प्राण्यांचा फडशा पाडला आहे. या बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा म्हणून वारंवार आवाज उठवला परंतु आजपर्यंत पाचोरा व जामनेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.
आता नुकतेच म्हणजे दिनांक १३ एप्रिल सायंकाळ पासून ते १४ एप्रिल २०२४ रविवार सकाळ पर्यंतच्या कालावधीत कुऱ्हाड शिवारातील वाकडी धरणाजवळ लताबाई पाटील यांच्या मालकीच्या गट नंबर ६४/अ शेतातील खळ्यावर बांधलेल्या अंदाजे पंधरा हजार रुपये किंमतीच्या वासरावर बिबट्याने हल्ला चढवून वासराला ठार केल्याची घटना आज सकाळी तानाजी पाटील शेतात गेले असता लक्षात आली आहे.
वरील गावातील शेती शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असल्याने बिबट्याच्या दहशतीमुळे शेतमजूर शेतात काम करण्यासाठी येत नसल्याने शेती कामे रखडली आहेत.