बनावट खत विक्री प्रकरणी खडकदेवळा येथील स्वामी कृषी केंद्राचे संचालक सुनील सिनकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१०/२०२२
(पकडा गया वो चोर है, बाकी सब शिरजोर है.
पाचोरा शहरात व तालुक्यातील बऱ्याचशा कृषी केंद्रांवर असाच गैरप्रकार सुरु होता व आहे तसेच काही कृषी केंद्राचे संचालक हे शेतकऱ्यांना उधारीवर बि, बियाणे, खते, किटकनाशके देऊन त्या उधारीच्या पैशांवर तीन ते पाच टक्के दरमहा व्याज आकारणी करुन एकप्रकारे अवैध सावकारी करुन गरजवंत शेतकऱ्यांची लुट करत आहेत. याबाबत सविस्तर वृत्त हाती आल्यावर लवकरच भांडाफोड.)
सद्यस्थितीत काही अल्पसंतुष्ट लोक जे फक्त आणि फक्त पैसा हाच परमेश्वर समजून झटपट श्रीमंत होण्यासाठी कोणत्याही मार्गाला व स्तरावर जाऊन जनतेची फसवणूक व लुट करतात परंतु हे करत असतांनाच समोरच्या व्यक्तीचे किंवा समाजाचे किती नुकसान होत यांची किंचितही तमा न बाळगता आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून सर्रासपणे लुट व फसवणूक करतात.
असाच काहीसा प्रकार मागील काही वर्षांपासून कृषी केंद्रांच्या माध्यमातून सुरु असून आजपर्यंत बोगस बियाणे, बोगस तणनाशक, बोगस फवारणीची औषधे व महत्वाचे म्हणजे जो शेतकरी हाडाच पाणी करुन उपाशीपोटी राहुन आपल्या शेतात (काळ्या मातीत) बि, बियाणे टाकून त्याची निकोप व चांगल्याप्रकारे वाढ कशी होईल याची काळजी घेत पोटच्या मुलासाखे जपून योग्य वेळी खते, किटकनाशके, निंदणी, खुरपणी, कोळपणी करतो कोळपणी करतांना पायाला जखम झाली तरी त्याचे त्याला दुख होत नाही किंवा तो विव्हळत बसत नाही व जखमेवर माती लाऊन पुन्हा कोळपणीला सुरवात करतो परंतु जर का कोळपणी करतांना एखाद्या पिकाची फांदी तुटली तर तो विव्हळतो त्याला वाईट वाटते की एक फांदी तुटल्यामुळे कापसाची चार बोंड कमी पीकतील अश्या परिस्थितीत मर, मर, मरणारा शेतकऱ्यांना काही हरामखोरी करणारे कृषी केंद्राचे संचालक स्वताच्या फायद्यासाठी बोगस खते, बियाणे, फवारणीची औषधे महत्वाची खते विकतो व येथेच शेतकऱ्यांचा घात होतो व बारा महिन्यांचे स्वप्न रंगवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक प्रकारे सट्टाच खेळणाऱ्या शेतकऱ्याचा फक्त ओपण येतो पण जोड लागत नाही मात्र दुसरीकडे कृषी केंद्रांच्या संचालकाची व काही भ्रष्ठाचारी अधिकारी यांची मात्र चौकडी लागते व तो मालामाल होतो.
जसा सट्याच्या व्यवसायात दररोज कल्याण असो कि मुंबई याचा आकडा हा मोठ्या शहरातून जाहीर होतो व थेट मोठ्या शहरापासून तर सट्याचा जुगार खेळणाराच्या हातात त्याची रक्कम येईपर्यंत सगळेच आपले कमीशन काढून, काढून खाली पैसे पाठवतात तसाच काहीसा प्रकार कृषी विभागातील कृषी अधिकारी, कर्मचारी व कृषी केंद्राचे संचालक यांच्यात सुरु आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण काही बोटावर मोजण्याइतके व्यवसाय सोडले तर सगळीकडेच भेसळ व नकली मालाची दिवसाढवळ्या विक्री केली जात आहे. यात ज्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे तेच हप्ते घेऊन या भ्रष्टाचाऱ्यांना पळवाटा सांगुन पध्दतशीरपणे काळा पैसा कमावण्यासाठी रान मोकळे करून देत आहोत. म्हणजेच थोडक्यात कुंपणच शेत खातय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथील स्वामी कृषी केंद्रात आढळून आला असून या स्वामी कृषी केंद्राचे संचालकांनी कायद्याची कुठलीही भीती न बाळगता आपल्या कृषी केंद्रातून इंडियन पोटॅश लिमिटेड (आय. टी. एल.) कंपनीच्या बनावट म्युरेट ऑफ पोटॅश या रासायनिक खताची दिवसाढवळ्या विक्री करुन कष्टकरी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची घटना जळगाव जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक श्री. अरुण तायडे यांनी स्वामी कृषी केंद्रांवर धाड टाकून नुकतीच उघडकीस आणली असून याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक श्री. अरुण तायडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील स्वामी कृषी केंद्रांवर धाडसत्र राबवून बनावट रासायनिक खताच्या विक्रीस बंदी आदेश देऊन स्वामी कृषी केंद्रांवर सापडलेल्या बनावट खताचा नमुना व बनावट खताच्या बॅगाचे फोटो घेऊन इंडियन लिमिटेड या कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी श्री. शिवाजी ठवरे साहेबांच्या अखत्यारीत इंडियन पोटॅश लिमिटेड या कंपनीच्या मुख्यालयात तपासणीसाठी पाठवले होते. मुख्यालयातील प्रयोगशाळेतून तपासणी अहवाल दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२२ सोमवार रोजी देण्यात आला आहे. या कंपनीच्या प्रयोग शाळेतील अहवालानुसार या बनावट रासायनिक खतामध्ये अपेक्ष पोटॅशचे प्रमाण ६० टक्के ऐवजी फक्त आणि फक्त १५.४३ टक्केच असल्याचे आढळून आल्यामुळे सदरचा नमुना हा अपात्र असल्याचे सांगत रासायनिक खतांच्या बॅगवरील बॅच नंबर, लॉट नंबर तसेच बॅग मध्ये आढळून आलेले रासायनिक खत हे आमच्या कंपनीचे उत्पादन नसून ते कोणीतरी बनावट विक्री करत असल्याचे सांगितले आहे.
हा अहवाल हाती येताच मा. श्री. मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग यांच्या व श्री. संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये व श्री. अनिल भोकरे कृषी उपसंचालक जळगाव तसेच श्री. वैभव शिंदे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०१ नोव्हेंबर २०२२ मंगळवार रोजी जिल्हास्तरीय पथक व तालुकास्तरीय पथकातील सदस्य श्री. अरुण तायडे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक, श्री.. विजय पवार, मोहिम अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, श्री. मारुती भालेराव, कृषी अधिकारी पंचायत समिती पाचोरा व श्री. अशोक जाधव, मंडळ कृषी अधिकारी, पाचोरा यांनी श्री. स्वामी कृषी सेवा केंद्र खडकदेवळा बुद्रुक या ठिकाणी जाऊन मुरेट ऑफ पोटॅश हे खत जप्त केले व त्याचे संचालक श्री. सुनील प्रभाकर सिनकर यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहेत. पुढील तपास श्री. योगेश गणगे, पोलिस उपनिरीक्षक, पाचोरा पोलिस स्टेशन हे करत आहेत.
मा. श्री. मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक, यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की बियाणे,खते व कीटकनाशक ही अधिकृत विक्रेत्याकडूनच बिलामध्ये/ई पॉस मशीन द्वारे खरेदी करावे आणि अशा प्रकारचे बनावट रासायनिक खते व इतर कृषी निविष्ठा विक्री होत असल्याचे आढळून आल्यास कृषी विभागाकडे संपर्क करावा अशा विक्री करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.