शासकीय कापूस खरेदी केंद्रावर टोकन मिळवून देण्यासाठी दलाल सक्रिय ग्रेडर व व्यापाऱ्यांची मिलीभगत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/१२/२०२०
पाचोरा व जामनेर तालुक्यात सी.सी.आय. तर्फे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आली असून या कापूस खरेदी केंद्रावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळत नसून कापूस व्यापारी व ग्रेडर यांची हातमिळवणी झाली असल्याने टोकन मिळवण्यापासून तर ग्रेड (प्रतवारी) ठरवणे कापसाच्या वजनाला क्विंटलमागे कट्टी लावणे यासाठी दलाल सक्रिय असल्याने या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला असल्याचे जनमानसात बोलले जात आहे.
या बाबतीत अधिक तपास केला असता कापूस खरेदी केंद्रावर रितसर वाहने उभी करून टोकन घेऊन आपला नंबर केव्हा येईल या प्रतिक्षेत शेतकरी वाट पहात असतो परंतु काही ठिकाणी नंबर लागत नसल्याने शेतकऱ्यांना पाच ते सहा दिवस नंबर लागण्याच्या प्रतिक्षेत थांबावे लागत असल्याने या दिवसाचे वाहनभाडे तसेच इतर खर्च करणे महागात पडत आहे.
तसेच नंबर लागलाच तर प्रतवारी लावणे व वजन करणे यासाठी सारीपाटाचा खेळ खेळावा लागत आहे.
तसेच दलाला मार्फत गरजेनुसार व गरजवंतांची परिस्थिती पाहून २००/०० रुपयापासून ते ५००/०० रुपयापर्यंत टोकन विकले जात असल्याने इमानेइतबारे नंबरवर उभे असलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.
तसेच कापूस खरेदी केंद्रावरून टोकन घेतल्यानंतर जिनिंमध्ये सोडलेल्या वाहनांची संख्या व प्रत्येक जिनिंमध्ये दररोज प्रत्यक्ष मोजमाप झालेल्या वाहनांची संख्या यात मोठी तफावत दिसून येते हा प्रकार जेव्हा काही शेतकऱ्यांच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी कापूस खरेदी केंद्राचे आवारातील नंबरवरून निघणारी वाहने व जिनिंमध्ये मोजली जाणारी वाहने तपासली असता काही वाहने मधूनच आलेली आढळली
म्हणजे काही कापूस विक्रेत्यांना वाहन न लावताच टोकन दिले जाते व ही वाहने घरून निघाल्यावर थेट जिनिंमध्ये मोजमापासाठी पाठवली जातात या गैरप्रकारांमुळे शिस्तीने शासनाचे नियम पाळणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याने हि झंझट नको म्हणून कापूस उत्पादक शेतकरी नावीलाजास्तव व्यापाऱ्यांना कापूस विकत आहेत.
【या गैरप्रकाराबाबत कुणीही आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्यावर गुन्हे दाखल करु अशी धमकी ग्रेडरकडून दिली जाते व असे प्रकार घडत आहेत.】
सी.सी.आय.कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडर, जिनिंग मालक व व्यापारी यांची हातमिळवणी झाली असल्याने व टोकन विक्रीचा काळाबाजार सुरु असल्याने शेतकरी वैतागला असून बऱ्याचशा कापूस खरेदी केंद्रावर गोंधळ होऊन शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतल्याचे प्रकार घडत आहेत.
तरी लोकप्रतिनिधींनी कापूस खरेदी केंद्रावर सुरु असलेल्या या गैरप्रकाराबाबत सखोल चौकशी करून होत असलेला भ्रष्टाचार त्वरित थांबवावा अशी मागणी जोर धरत आहे.
(काही व्यापारी ग्रेडर, जिनिंग मालक व दलाल यांच्या रंगीत पार्ट्या रंगत असून भ्रमणध्वनी तपासल्यास नक्कीच काही गोष्टी समोर येतील असेही काहींचे म्हणणे आहे.)
(पुढील बातमी = कुऱ्हाडीचा दांडा , गोतास काळ.)