पाचोरा व जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा लवकरच जोडे व चपलांचा हार घालून सत्कार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०२/२०२३

पाचोरा ते जामनेर रस्त्यावर ठिकठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याकारणाने आजपर्यंत बरेचसे अपघात होऊन मोठ्याप्रमाणात वाहनांची मोडतोड होऊन काही वाहनधारकांना अपंगत्व तर काही वाहनधारकांना या जगाचा निरोप घ्यावा लागला असून अपघात झाल्यानंतर जीव वाचवण्यासाठी लाखो रुपये दवाखान्यात खर्ची घालावे लागत आहेत. विशेष म्हणजे याच रस्त्यावरुन प्रत्येक शनिवार व रविवारी नामदार मंत्री मा. श्री. गिरीशभाऊ महाजन येत, जात असतात परंतु कदाचित ते लाखो रुपये किंमतीच्या वातानुकुलीत व्हीआयपी गाडीतून प्रवास करत असल्याने त्यांना या खड्ड्यांची जाणीव होत नसल्याने रस्ता किती खराब झाला आहे हे कदाचित माहीत पडत नसेल.

एकाबाजूला महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून “रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे” असे मोठमोठे फलक लावून प्रदर्शन करत असते तर दुसरीकडे “रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते” हेच कळायला मार्ग नसून बऱ्याचशा ठिकाणी तर या रस्त्यावरचे खडी, डांबर नाहीसे झाले आहे. ठिकठिकाणच्या पुलाचे कठडे तुटले आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत रस्तच्या मध्यापासून दहा मीटर अंतराच्या आत सगळीकडेच अतिक्रमण असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत असून यातूनच लहानमोठे अपघात घडत असल्याने हे अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे याकरिता सुज्ञ नागरिकांनी वारंवार आवाज उठवला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी डोळ्यावर डोळ्यावर अर्थपूर्ण पट्टी बांधून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे. ही अतिक्रमणे काढली जात नसल्याने या अतिक्रमण धारकांची दादागिरी वाढली आहे. यामुळे वाहनधारक व अतिक्रमण धारकांची दररोज बाचाबाची होत असते विशेष म्हणजे हे अतिक्रमण बसस्थानक, मराठी शाळा, सार्वजनिक वापराच्या ठिकाणी असल्याने खुपच अडणी येत आहेत.

जामनेर ते पाचोरा या रस्त्याचे त्वरित नुतनीकरण व्हावे म्हणून आजपर्यंत बऱ्याचशा समाजसेवकांनी व सर्वसामान्य जनतेने वारंवार अर्जफाटे व आंदोलनाचे इशारे दिले मात्र या गेंड्याच्या कातडीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मागणीकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याने आता सर्वसामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत झाला असून येत्या आठवड्यात या रस्त्याचे नुतनीकरणासाठी कामाला सुरुवात न झाल्यास पाचोरा व जामनेर विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचा जोडे व चपलांचा हार घालून सत्कार करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून संबंधितांशी हितगुज केले असता आम्हाला जीव गहाण ठेवून जर या रस्त्यावरून प्रवास करावा लागत असेल तर आम्हाला आमच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन करणे भाग असून होणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींची असेल असे सांगितले.

ब्रेकिंग बातम्या