महा वितरण कंपनी म्हणजे विद्यूतचोरांची धणी. वाढीव बीलामुळे विद्यूतग्राहकांच्या डोळ्यात पाणी
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०२/२०२१
एकीकडे विद्यूतचोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यांच्यावर महावितरण कोणतीही धडक व कडक कारवाई करत नसल्याने आजच्या परिस्थितीत ग्रामीण भागात हजारोंच्या संख्येने विद्यूतचोरांची संख्या दिसून येत आहे. तसेच या विद्यूतचोरांना बिल भरण्याची चिंता नसल्याने तर काही विद्यूतचोरांचे व विद्यूत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे लागेबांधे असल्याने चिरीमिरी (हप्ता) देऊन दिवसाढवळ्या विद्यूतचोरी केली जाते या गैरप्रकारांने विद्यूतचोरांना (नाही भय) व विद्यूत कर्मचाऱ्यांना (नाही लज्जा) असा कारभार सुरू असल्याने विद्यूतदिवे, पंखा, टिव्ही व इतर विद्यूत उपकरणे हे रात्रंदिवस वापरतात व हजारो युनिट विज खर्ची घालतात.
या विद्यूतचोरीमुळे महावितरण कंपनीला दररोज लाखोरुपये तोटा होतो. व हा तोटा भरून काढण्यासाठी कंपनी विद्यूत ग्राहकांच्या बिलावर स्थीर आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, विज विक्री कर, व्याज असे विविध कर आकारून रीतसर मिटर रीडिंग न घेता अंदाजे बिल आकारून खाजगी सावकारी प्रमाणे थकित वीज बिलावर व्याज आकारून मनमानी करून विद्यूतग्राहकांच्या माथी बोजा टाकला आहे.
त्यातल्यात्यात वीजबिलावर (तूट फंड) आकारण्यात आला आहे. हे पाहाता हा सगळा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याश्याला फाशी असेच म्हणावे लागेल.
तसेच महसुली तूट वाढत असल्यामुळे सरकारने थकित वीज बिल वसूल करण्यासाठी वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकारने कारवाई सुरू केली असून तब्बल ७१ लाख ६८ हजार ५९६ ग्राहकांना महावितरण’कडून नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचे खात्रीपूर्वक समजते.
महत्त्वाचे म्हणजे लॉकडाऊन कालावधीत वापरण्यात आलेल्या घरगुती वापराचे विजेचे बिल भरु नये. हे बिल माफ करण्यात येणार आहे असेही चर्चेत होते मात्र दुसरीकडे
महसुली तूट वाढल्यामुळे महावितरणला आपला कारभार करण्यासाठी कसरत करावी लागते त्यामुळे सरकारने तर वीज बिलाबाबत कडक भूमिका घेतली असून ग्राहकांना नोटीस पाठवली आहे या नोटिशीत ग्राहकांना वीज बिल भरण्याची ताकीद देण्यात आली आहे. तसेच पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागात व परिसरामध्ये थकबाकीदारांना महावितरणचे कर्मचारी नोटीस देत असल्याने थकबाकीदारांनी चांगलाच धसका घेतला असून लॉकडाऊन कालावधीत खेड्यात हाताला काम नसल्याने जेमतेम मोलमजुरी करून संसाराचा गाडा ओढतांनाच महावितरणकडून मिळालेली नोटीस म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली असल्याचे विद्यूतग्राहक सांगतात.
तरी लोकप्रतिनीधींनी या बाबतीत लक्ष देऊन योग्य तोडगा काढून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी खेड्यापाड्यातील जनतेने केली आहे.