आखाडा ग्रामपंचायतीचा मात्र आराखडा विधानसभेचा.
![](https://satyajeetnews.com/wp-content/uploads/2024/03/featured-image-1.jpg)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/१२/२०२०
महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका प्रारंभ झाल्या असून या निवडणुकीची प्रक्रिया काल दिनांक २९ डिसेंबर पावेतो ऑनलाईन सुरू होती परंतु राज्यभरातून या प्रक्रियेला अडचणी येऊ लागल्याने सर्व स्तरावरून आयोगाकडे ऑफलाईन प्रक्रियेची मागणी केली होती. ही अडचण लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने गांभीर्याने विचार करून आज पासुन दिनांक ३० डिसेंबर रोजी ऑफलाइन प्रक्रियेला मान्यता दिली व प्रक्रिया प्रारंभ झाली याचा प्रत्यक्ष अनुभव आज पाचोरा तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज विक्री व भरण्याच्या प्रक्रियेला दिसून आला.
आज ऑफलाइन प्रकिया सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली त्यानुसार इच्छुक उमेदवारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
【मात्र या ऑनलाइन व ऑफलाईन सुरु करण्याचे श्रेय घेण्यासाठी सगळ्यांनीच आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला】
या प्रकारावरुनच पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवणूका किती चुरशीच्या होणार हे सिद्ध होते.
पाचोरा तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा बिगुल वाजल्यापासून गावागावात तरुण तुर्क व म्हातारे अर्क यांची जुगलबंदी सुरु असून यात हौश्या, नवश्यांची तात्पुरती चलती आहे.तसेच सरपंच पदाचे आरक्षण राखीव असल्याने (बेगाने के शादिमे अब्दुल्ला दिवाणा) अश्या प्रकारे निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.
या निवडणुकीत अगोदर फक्त गावपातळीवरील लोक सहभागी होऊन ग्रामपंचायत निवडणूक लढवली जात असे मात्र आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आजी, माजी, खासदार, आमदार, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आपल्या भविष्याचा वेध घेण्यासाठी धडपडतांना दिसून येत आहेत.
या मागचे कारणही तसेच आहे. ज्या पक्ष कार्यकर्त्यांच्या ताब्यात ग्रामपंचायत असेल त्याला त्या गावातून पंचायत समिती, जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाचे उमेदवारासाठी गठ्ठा मतदान मिळवणे सोपे व सोयीचे असते म्हणून तालुकास्तरावरुन पाया मजबूत करण्यासाठी यावर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा व तालुक्यातील पक्षश्रेष्ठींनी आपपल्या पध्दतीने मोर्चे बांधणी सुरु केली आहे. एवढ्यावरच हे राजकारण थांबले नसून सत्ताधारी आपली सत्ता अबाधित कशी राहील याकरिता तर ज्यांच्या हाती सत्ता नाही ते भविष्यात आमच्या हाती सत्ता यावी म्हणून उमेदवार उभे करण्यापासून तसेच आर्थिक खर्च करण्यासाठी तयार असून गावागावात प्रत्येक पक्ष आपले पॅनल व उमेदवार उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
याचाच परिणाम म्हणजे कुठे समोरासमोर तर कुठे त्रिशंकू निवडणूक होण्याची शक्यता असल्याने गावागावात फूट पडत असल्याने जीवलग मित्र, सख्खे भाऊ, सासुबाई विरुध्द सुनबाई तर काही ठिकाणी बाप विरुद्ध बेटा ग्रामपंचायत निवडणुकीत उतरल्याचे दिसून येत आहे.
पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत एका बाजूला भारतीय जनता पक्ष तर दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रीय कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस एकत्रपणे निवडणूक लढवत असून या एक बाय तीन निवडणूकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
याबाबत सविस्तर असे की भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हे मागील विधानसभा निवडणुकीत अल्पशा मताने पराभूत झाले होते. पराभूत झाल्यावरही त्यांनी कोणावरही राग रोष किंवा नाराजी न ठेवता सतत गावागावात जाऊन जनतेच्या संपर्कात राहून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी झटत आहेत.तसेच अमोल शिंदे यांनी त्यांच्या प्रयत्नातून गावागावात तयार केलेले संघटन व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सावध पावित्रा घेतला असल्याने बऱ्यापैकी ते या खेळीत यशस्वी होतील असे बोलले जात आहे.
तसेच विद्यमान आमदार किशोर पाटील. हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने त्यांनी गावागावात मोठ्या प्रमाणात विकासकामे देऊन गावविकासासह अनेक अडचणी सोडवल्या आहेत. तसेच आता होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवणूका बिनविरोध व्हाव्यात म्हणून ते प्रयत्नशील असून बिनविरोध निवडून येणाऱ्या सदस्याला तीनलाख रुपये निधी देणार असल्याचे जाहीर केले असून गावातील एकोपा टिकून रहावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक शिवसेना व राष्ट्रीय कॉँग्रेस सोबत राहून एकत्र लढायचे ठरले असल्याने माजी आमदार दिलीप वाघ हे गावागावातील आपल्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त उमेदवारी देऊन न्याय कसा देता येईल या प्रयत्नात असून या निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात होऊन गावात शांतता व एकोपा टिकून रहाण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
तसेच भावी आमदार म्हणून संबोधले जाणारे राष्ट्रीय कॉँग्रेसचे सचिन सोमवंशी हेसुध्दा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खांद्याला खांदा देत निवडणुकीत जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवण्यासाठी सक्रिय झाले असून आरोग्यसेल च्या माध्यमातून केलेली कामे व जनसंपर्क मोठा आहे.
यावेळी होऊ घातलेल्या निवडणूका ह्या भविष्यात होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हापरिषद, विधानसभा याचे समिकरण डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीत मात्तबर राजकीय नेते व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.