भारनियमनाचा फटका चोरांनी दाखवला झटका, लोहारी गावात धाडसी चोरी
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०४/२०२२
पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथील गावाबाहेरील नवीन प्लॉट परिसरातील एका घरात दिनांक २३ एप्रिल शनिवार मध्यरात्रीपासून ते दिनांक २४ एप्रिल २०२२ रविवार सकाळी साडेपाच वाजेपर्यंत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून नऊ तोळे सोने व पंचवीस हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असून या घटनेमुळे लोहारी गावातील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सद्यस्थितीत सगळीकडे भारनियमन केले जाते आहे. हे भारनियमन करतांना खेड्यापाड्यात जास्तीत जास्त भारनियमन करण्यात येत असून भारनियमन करतांना कोणताही काळवेळ ठरलेला नसल्याने रात्री, अपरात्री भारनियमन केले जात आहे. उन्हाळ्याचा कालावधी असल्याकारणाने वातावरणात उष्णतेचे प्रमाण खुपच वाढले असून डासांचा उपद्रव वाढला आहे. यापासून सुटका मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील लोक रात्री आपापल्या घराच्या छतावर झोपून उकाड्यापासून व डासांपासून सुटका करुन घेत आपले दिवस काढत आहेत.
नेमका याच संधीचा फायदा घेत पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथील नविन प्लॉट भागातील मुकुंदा आनंद पाटील यांच्या घरात दिनांक २३ एप्रिल शनिवार मध्यरात्रीपासून ते दिनांक २४ एप्रिल २०२२ रविवार सकाळी साडेपाच वाजेपर्यंत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून नऊ तोळे सोने व पंचवीस हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याची बाब रविवारी सकाळी साडेपाच वाजेच्यासुमारास सौ. सुरेखा मुकुंद पाटील ह्या नियमितपणे उठून खाली आल्यानंतर लक्षात आली आहे.
या घटनेबाबत पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला भ्रमणध्वनीवर कळवण्यात आले होते. ही खबर मिळताच पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन श्वानपथक व फिंगरप्रिंट तज्ञांना बोलावणे गरजेचे असल्याचे सांगितले व ते येईपर्यंत कुणीही घरात प्रवेश करु नये व इतर वस्तूंना हात लावू नये अश्या सुचना करुन पुढील कार्यवाहीसाठी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवून रीतसर तपास सुरू केला असल्याचे समजते.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.