भोकरी, वरखेडी येथून आयशर गाडी चोरीला, वाहनधारकांमध्ये घबराट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०३/२०२३
सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कमालीची बिघडली असून सर्व प्रकारच्या अवैध धंद्यासह मारामाऱ्या, खुन, दरोडा, लुटमार अश्या घटना दिवसाढवळ्या घडत असल्याने सर्वसामान्य जनतेतून कमालीची चिंता व्यक्त केली जात असून सर्वसामान्य काबाडकष्ट करून कायद्याच्या चौकटीत राहून जीवन जगण्यासाठी धडपड करणारांसाठी दिवसेंदिवस बिकट परिस्थिती निर्माण होत आहे.
अश्यातच एक चोरीची घटना घडली असून पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथुन जवळच असलेल्या भोकरी येथील रशीद उखर्डू कहाकर यांच्या घरासमोर रेल्वे फाटका पासून थोड्याच जामनेर ते पाचोरा रस्त्यालगत उभी असलेली एम. एच. १९ झेड २९२८ या क्रमांकाची आयशर गाडी दिनांक २१ मार्च २०२३ मंगळवार मध्यरात्रीनंतर ते २२ मार्च २०२३ बुधवार रोजीच्या रात्री एक वाजेपासून ते सकाळी दोन वाजेपर्यंतच्या दरम्यान चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
गाडी चोरीला गेल्याची घटना लक्षात येताच रशीद कहाकर व त्यांच्या कुटुंबीयांनी गाडीची शोधाशोध सुरु केली आहे. ही शोधाशोध सुरु असतांनाच भोकरी येथून पाचोरा कडे जातांना लोहारी येथील एका सद्गृहस्थाच्या घरासमोरील सी. सी. टी. व्ही. कॅमेरे तपासले असता रात्री ०१ वाजून ५१ मिनिटांच्या वेळात चोरीला गेलेली आयशर गाडी पाचोरा शहराकडे जातांना दिसून येते आहे. संबंधित गाडी मालक यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये घटना कळवताच पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी सगळीकडे बिनतारी संदेश देऊन सुचित केले आहे.
वरील क्रमांकाची चोरीला गेलेली आयशर गाडी कुणालाही आढळून आल्यास ९७३०८६११८६ या भ्रमणध्वनी क्रमांक संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.