मालवण

काळसे हुबळीचा माळ येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने रस्त्यावरून जाणाऱ्या पाच महिलांना जोरदार धडक दिल्याची घटना आज सायंकाळी घडली. यात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक विजय यादव, पोलीस उपनिरीक्षक श्री. झांजुर्णे यांच्यासह अन्य पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. काळसे बौद्धवाडी येथील पाच महिला सायंकाळी रस्त्याने जात असताना कुडाळ- नेरुरपार येथून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार जण जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थांनी या घटनेची माहिती १०८ रुग्णवाहिकेला देताच घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाली. जखमी रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.